लातूरमध्ये एका कारला आग लागून त्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. मात्र चाणाक्ष पोलिसांना काही काळेबेरे असल्याचा संशय आल्याने जलदगतीने तपासाला सुरुवात केली आणि पोलिसांचा संशय खरा ठरला. जणू सुताने स्वर्ग काढल्यासारखा अवघ्या २४ तासात प्रकरणाचा छडा लावला. कारमध्ये मृत म्हणून ज्या तरुणाचे नाव न पुढे आले होते तोच तरुण देवगडमध्ये जीवंत सापडला आहे. १ कोटीचा विमा मिळविण्यासाठी हा बनाव रचल्याचे म्हटले जात असून कारमध्ये सापडलेला मृतदेह कोणाचा हे गुलदस्त्यात आहे. या साऱ्या प्रकरणाने पोलीसदलात खळबळ उडाली आहे. लातूरमधील औसा तालुक्यामध्ये एका कारमध्ये तरुणांचा जळून मृत्यू झाला. या घटनेचा तपास पोलीस करत असताना त्यांना कारमध्ये जळालेल्या तरुणाचे नाव पुढे आले होते.
तोच तरुण कोकणातील देवगड परिसरात गेल्याचा सुगावा लागला. विमाचे १ कोटी रुपये मिळावेत यासाठी त्याने हा बनाव केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. औसानजिक कार जळाली आणि त्यामध्ये एक मृतदेह होता ही वस्तुस्थिती आहे. जर ज्याचे नाव पुढे आले तो जीवंत असेल तर कारमध्ये जळालेला ‘तरुण कोण याबाबत तपास सुरू झाला आहे. देवगड येथे तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन गेले आहेत. अधिक तपास सुरू केल्यानंतर त्याला पोलिसीखाक्या दाखविण्यात आला. यावेळी संबंधित तरुण पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने केवळ १ कोटी रुपयांचा विमा मिळविण्यासाठीच हा सारा खटाटोप केल्याची बाब पुढे व आली आहे.
दरम्यान लातूरमधून कार औसा मार्गावर घेतल्यानंतर त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना सुचली. त्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या एका तरुणाला कारमध्ये घेतले. त्याला बांधून ठेवले आणि कारला आग लावली, अशी बाब तपासाच्या पुढील टप्प्यात पुढे आली आहे. मात्र ही व्यक्ती कोण हेही अद्याप स्पष्ट झालेली नाही. अधिक तपास लातूर पोलीस करीत असून लवकरच दोन्ही नावे पुढे येतील आणि घटनेमागे नेमके रहस्य काय हे समजेल, असे म्हटले जात आहे.

