25.8 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriरत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

तरुणी पाणभुयार स्पॉटजवळ सेल्फी घेण्यात गुंग होती.

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या तरूणीचा शोध अजूनही लागलेला नाही. दरम्यान दोन दिवसांपूर्वी नाशिकमधून एक तरूणी बेपत्ता झाली असल्याचे पोलिसांना नाशिकवरून कळविण्यात आले असून ही तरूणी नाशिकची तर नाही ना? या अनुषंगाने आता तपास सुरू झाला आहे. एका बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याचा या प्रकरणाशी संबंध असावा, अशीही चर्चा सुरू आहे. रत्नदुर्ग किल्ल्याजवळील पाणभुयार स्पॉट येथे रविवारी समुद्रात पडलेली एक अज्ञात तरुणी अद्याप बेपत्ता असून, दोन दिवस उलटूनही तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. सोमवारी सकाळपासून पुन्हा एकदा पोलिस व आपत्कालीन पथकांनी शोधमोहीम राबवली, मात्र ती सापडली नाही. दरम्यान मंगळवारी नाशिकमधून एक तरूणी बेपत्ता असल्याची माहिती रत्नागिरी पोलिसांना मिळाली आहे. ती तरूणी रत्नागिरीत आली होती. या तरूणीने रत्नदुर्ग किल्ल्यावरून शहरातील एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून आपल्या मित्राला फोन केला होता, अशी चर्चा सुरू आहे. या फोननंतर ती तरुणी गायबच आहे. त्यामुळे समुद्रात पडलेली तरुणी नाशिकमधील असण्याची शक्यता वाढली आहे.

अडीचशे फुटांवरून पडली – ही घटना रविवार दि. २९ जून रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे २३ ते २५ वयोगटातील एक तरुणी पाणभुयार स्पॉटजवळ सेल्फी घेण्यात गुंग होती. या दरम्यान तिने आपली चप्पल आणि स्कार्फ बाजूला ठेवले आणि ती रेलिंगच्या पुढे गेली. अचानक तोल जाऊन ती थेट खोल समुद्रात (सुमारे २०० ते २५० फूट) पडली. आजूबाजूच्या पर्यटकांनी आरडाओरड केली, मात्र ती काही क्षणांतच खवळलेल्या समुद्रात गायब झाली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस, रत्नदुर्ग माउंटेनियर्स, आणि चिपळूणहून आलेले एनडीआरएफचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. फिशरीज विभागाच्या दोन ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, खवळलेला समुद्र आणि जोरदार वाऱ्यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले.

सर्वत्र शोध – तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. शहरातील सर्व शासकीय व खासगी वसतीगृहे, शाळा व महाविद्यालयांत पोलिसांनी तपास केला. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील कोणतीही तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स तसेच पर्यटकांकडून वर्णन मिळवण्याचा प्रयत्न केला, तरीही कोणतीही ठोस माहिती हाती लागलेली नाही.

बँकेत काम करणारी तरूणी – दरम्यान मंगळवारी रत्नागिरी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दि. २८ जून रोजी बँकेत काम करणारी एक तरुणी नाशिकमधून बेपत्ता झाली होती. त्याबाबत तिच्या नातेवाईकांनी नाशिकमधील पोलीस स्थानकात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तर त्याच तरुणीने रविवारी १०. ३० वाजता रत्नदुर्ग किल्ल्यावरून तिथे फिरायला गेलेल्या अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून आपल्या रत्नागिरीतील मित्राला फोन केला होता. नंतर ती बेपत्ता झाली आहे. याच दरम्यान एक तरुणी समुद्रात पडल्यामुळे ही तरुणी नाशिकची असल्याची शक्यता वाढली आहे. शहर पोलिस निरीक्षक सतिश शिवरकर हे या अनुषंगाने तपास करत आहेत. किल्ल्यावरून पडलेली तरूणी हीच नाशिकमधून बेपत्ता झालेली तरूणी आहे का? याचा शोध घेतला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular