तालुक्यातील वाटद एमआयडीसी येथे धीरूभाई अंबानी डिफेन्ससह अन्य प्रदूषणमुक्त उद्योग येणार आहेत. वाटदमध्ये विरोध करणाऱ्या काही लोकांचा स्वार्थ आहे; परंतु एमआयडीसी हवी असणाऱ्या शेतकरी आणि ग्रामस्थांची शनिवारी (ता. २६) सायंकाळी ५ वाजता बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीला मला निमंत्रित केले आहे. आज मला आठ सरपंच, शेतकरी भेटले. किती जमीन आणि कोणाची ते मी त्या बैठकीत जाहीर करणार आहे, असा इशारा राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. रत्नागिरी दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. श्री. सामंत म्हणाले, “वाटद येथील शेतकरी, सात ते आठ गावांचे सरपंच येऊन भेटले व वाटद एमआयडीसी झाली पाहिजे. येथील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली. एमआयडीसीला विरोध करणाऱ्यांमध्ये काही लोकांचा स्वार्थ आहे.
वाटद एमआयडीसीच्या समर्थनार्थ शनिवारी स्थानिक ग्रामस्थांनी सभा आयोजित होणार आहे. मला त्या सभेला निमंत्रित केले आहे. ही एमआयडीसी स्थानिकांना विश्वासात घेऊन केली जाणार आहे. उद्योग आणतानाही प्रदूषणमुक्त प्रकल्प आणले जाणार आहेत. या सभेत कोणकोणत्या शेतकऱ्यांनी किती जमीन दिली आहे, याची माहिती मांडली जाईल. एमआयडीसीला विरोध करणाऱ्या सभेसाठी अॅड. असीम सरोदे उपस्थित होते. ते आपले मित्र असून, त्यांना काही लोकांनी चुकीची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व आपण शनिवारच्या सभेत पुराव्यानिशी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाटद येथील माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू पाटील, २२ खेडे बहुजन संघाचे अध्यक्ष भाई जाधव, विष्णू पवार, माजी समाजकल्याण सभापती शरद चव्हाण, योगेंद्र कल्याणकर, बापू भोसले, अनिकेत सुर्वे, नामदेव चौघुले, सुजित दुर्गवली, सुयोग आढाव, प्रकाश वीर, संतोष सुर्वे, बाळू पाष्टे, संतोष तांबटकर यांच्यास अनेक ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी सामंतांची भेट घेतली.