अवकाळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट आदी प्रतिकूल परिस्थितीने गेल्या काही वर्षामध्ये बागायतदारांना हमखास उत्पन्न मिळवून देणारे आंबा, काजू पीक धोक्यात आले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सुरू केल्यामुळे दिलासा मिळाला. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असून शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र, ऑनलाईन अर्ज करण्याच्या वेबसाईटला सातबारा अन् फेरफारची खातरजमा करण्यासाठी जोडलेल्या महसूल- विभागाच्या वेबसाईटचा सर्व्हर डाऊन आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
वातावरणामुळे फळबागायतदारांचे नुकसान झाल्यास पिकाला संरक्षण मिळावे म्हणून शासनाने विमा योजना सुरू केली. त्यामध्ये बागायतदाराला पीक संरक्षण मिळावे आणि त्याचे जास्तीत जास्त नुकसान टाळता यावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसामुळे गेले दिवस काही आंबा आणि काजू बागायतदारांचे आर्थिक नुकसान होत आहे. बागायतदारांना फळ पिकविमा योजनेत मदतीचा हात मिळत होता. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांची फळपिक विमा उतरविण्यासाठी लगबग सुरू आहे. फळ पिकविमा उतरवण्याचा शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज करताना त्यामध्ये ज्या सात-बारा उताऱ्यावर आंबा-काजू याची नोंद आहे तो सात-बारा-फेरफार जोडले वा अपलोड केले जातात.
शेतकऱ्यांकडून सात-बारा वा फेरफार अपलोड केले जात असताना संबंधित साईटकडून ऑटोमेटिक शासनाच्या महसूल विभागाच्या साईटला संपर्क साधून त्या सात-बारा उतारे वा फेरफारची खातरजमा केली जाते. ही खातरजमा पूर्ण झाल्याशिवाय पिकविम्याची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. सात-बारा आणि फेरफारची खातरजमा होण्याची साईट गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. दुसऱ्या बाजूला पिकविमा उतरवण्याची मुदत अवघ्या दोन दिवसांची शिल्लक आहे. अशा स्थितीमध्ये पिकविमा कसा उतरविला जाणार, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे.