यंदा घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत जात, उत्पन्न, नॉन क्रिमिलेअर, नॅशनालिटी, रहिवासी अशा विविध प्रमाणपत्रांची विद्यार्थ्यांना आवश्यकता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची सेवाकेंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामध्ये प्रमाणपत्रांच्या शुल्कात अचानक वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागणार आहे. यापूर्वी एका प्रमाणपत्रासाठी साधारण ३३.६० ते ५७.२० रुपये एवढे शुल्क होते. मात्र, २५ एप्रिलपासून नव्या दरांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या दरात मुद्रांक शुल्क, राज्य व केंद्रीय जीएसटी, सेतू सेवा शुल्क, महाआयटी शुल्क आणि सेवा केंद्रचालकाचे शुल्क यांचा समावेश आहे.
महागाई, सेवाकेंद्रांची देखभाल, कर्मचारी मानधन, वीजबिल यामुळे ही वाढ झाल्याचे सांगण्यात येते. यामध्ये विविध दाखल्यांचेही दर वाढल्याने त्याचा सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसला असून, त्यातून सर्व प्रमाणपत्रांच्या शुल्कातील दरवाढीमुळे सर्वसामान्यांमधून नाराजीचाही सूर उमटत आहे.