शहराजवळच्या एमआयडीसी भागात काल मध्यरात्री मस्करीतून लोकप्रतिनिधीच्या ओल्या पार्टीत जोरदार राडा झाला. एकाच ग्लासातील मित्र एकमेकांवर तुटून पडले. काही सरकारी अधिकाऱ्यांच्या समोरच हे धुमशान झाले. एकाने तर लोखंडी फाईट मारल्याने नव्याने पक्षात आलेल्या एका नेत्याच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. हा विषय अधिक ताणला गेला आणि दोन्ही गटांचे अन्य सहकारी जमा होऊ लागले; परंतु वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने या विषयावर पडदा पडला. आज दिवसभर मात्र याची चर्चा शहरात सुरू होती. रत्नागिरी एमआयडीसी परिसरात काल रात्री एका ओल्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
एका बड्या नेत्याच्या उपस्थितीत ही पार्टी होणार होती. त्यासाठी राजकीय नेत्याच्या जवळचे बरेचसे मित्रपरिवार आणि काही सरकारी अधिकारी यांना खास निमंत्रण देण्यात आले होते. पार्टीत प्रत्येकाच्या आवडीचे मेनू होते. यामध्ये झणझणीत मटण देखील होते, तर प्रत्येकाच्या फर्माईशनुसार मद्य होते. बडे अधिकारी या पार्टीला उपस्थित असल्याने अनेकांना आपण नेत्याच्या किती जवळ आहोत, हे दाखवण्याचा मोह आवरला नाही. ओली पार्टी चांगलीच रंगात आली. पार्टीसाठी खास साऊंड व्यवस्था देखील होती. ‘ओंकारा’च्या गीताने या पार्टीला सुरुवात झाली. बघता बघता पार्टी चांगलीच रंगात आली.
पार्टी सुरू असतानाच बड्या नेत्यासोबत सावलीसारखा फिरणारा एक पदाधिकारी अनेकांच्या डोळ्यात खुपत होता. या पदाधिकाऱ्यामुळे आपल्या मित्राचे अस्तित्व धोक्यात आले, असा समज काहींनी करून घेतला. त्यातून त्या पदाधिकाऱ्याला मस्करीतून डिवचण्यात आले आणि तुफान राड्याला सुरुवात झाली. पार्टीत तू तू मैं मैं सुरू झाली. एकमेकांना आव्हाने देण्यात आली. बघता बघता हातापाईवर प्रकरण गेले. त्या पदाधिकाऱ्याने आपल्या भावाला कॉल केला आणि काही क्षणात त्याचा भाऊ त्याच्या पंटर लोकांना घेऊन घटनास्थळी पोहोचला. या पार्टीत एक तरुण ज्याच्या वादावरून सुरुवात झाली तो नेहमीच आपण अजिंक्य आहोत, अशा आविर्भावात वावरत होता त्या तरुणाला बाहेरून आलेल्या टोळक्याने तुफान रगडले.
हातात भेटेल त्या वस्तूने त्या तरूणाला मारहाण केली. त्या तरुणाने आपल्या साथीदारांना कॉल केला आणि झालेल्या मारहाणीची माहिती दिली आणि मग काय ? त्या तरुणाचे मित्र देखील सुसाट वेगाने एमआयडीसी परिसरात दाखल झाले आणि दोन गटांत फिल्मीस्टाईल हाणामारीला सुरुवात झाली. दोन्ही गटांनी आमने-सामने हातात काठ्या, दांडू, फाईट घेऊन एकमेकांवर चाल केली. बड्या नेत्यासोबत असणारा तो पदाधिकारी आणि मारहाण झालेला तरुण यांच्यात चांगलीच जुंपली होती. या दरम्यान अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नाही.