येथील विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढतीची शक्यता जवळपास निश्चितीकडे जावू लागली आहे. ठाकरे शिवसेनेचे राजन तेली आणि महायुतीचे दीपक केसरकर यांच्याबरोबरच महाविकास आघाडीतील अर्चना घारे परब आणि महायुतीतील विशाल परब या दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात या आधी अशा बहुरंगी किंवा ताकद असलेल्या उमेदवारांनी बंडखोरी केल्यास निकालावर प्रभाव पडू शकतो हे या आधीच्या काही लढतींमधून दिसून आले आहे. यामुळे ही बहुरंगी लढत सावंतवाडीला चुरशीकडे घेऊन जाणारी ठरणार आहे. तेली विरूद्ध केसरकर अशी दुरंगी लढत होईल आणि दोन्ही प्रमुख आघाड्यांमधील बंडखोरी थोपवली जाईल, अशी शक्यता व्यक्त होत होती; मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अर्चना घारे परब आणि भाजपच्या विशाल परब यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. त्यामुळे माघारीचा टप्पा पुढे असला तरी हे उमेदवार रिंगणात राहण्याची शक्यता अधिक आहे.
सावंतवाडी मतदारसंघाला विधानसभेच्या राजकारणाचा मोठा इतिहास आहे. ताकद असलेले जास्त उमेदवार उभे राहिल्यास काय प्रभाव पडू शकतो, याची काही उदाहरणे आहेत. १९९५ च्या निवडणुकीत सावंतवाडीतून तब्बल १४ उमेदवार होते. यात काँग्रेसतर्फे प्रवीण भोसले, शिवसेनेतर्फे वर्षा पालव, जनता दलातर्फे वसंत केसरकर आणि अपक्ष म्हणून उतरलेल्या राजमाता सत्वशिलादेवी भोसले अशी दिग्गज नावे यादीत होती. यात भोसले यांनी विजय मिळवला असला तरी नवख्या असलेल्या शिवसेनेच्या पालव यांनी तब्बल ३१ हजार मते मिळवली होती. शिवसेनेच्या जिल्ह्यातील स्थापनेत महत्त्वाचा वाटा असलेल्या व जनता दलातर्फे उतरलेल्या वसंत केसरकर यांनी तब्बल २४ हजारांहून जास्त मते मिळवली होती. भोसले ३९,८४९ मते घेत विजयी झाले होते.
१९९९ ची निवडणूक तिरंगी असली तरी त्यावेळी प्रवीण भोसले राष्ट्रवादीतर्फे आणि विकास सावंत काँग्रेसतर्फे रिंगणात होते. या दोघांना अनुक्रमे ३०,०२३ आणि १५,९५९ मते मिळाली होती. या मतविभागणीचा फायदा घेत नव्याने उतरलेले शिवराम दळवी ३१२५४ मते मिळवून शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झाले होते. २००४ ची निवडणूकही तशीच लक्षवेधी ठरली होती. यावेळी काँग्रेसतर्फे प्रवीण भोसले आणि काँग्रेस आघाडीतून बंडखोरी करत सुरेश दळवी अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. यात भोसले यांना ३४,८६८ तर दळवींना २६७८२ मते मिळाली होती. शिवसेनेच्या तिकीटावर ३९१५२ मते घेत पुन्हा एकदा शिवराम दळवी निवडून आले.
… तर चुरस कमालीची वाढणार – सावंतवाडीत पुन्हा एकदा पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसमोर सौ. घारे-परब आणि विशाल परब यांच्या उमेदवारीचे आव्हान आहे. या दोन्ही उमेदवारांचा चांगला जनसंपर्क आहे. अर्ज भरताना त्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनातून याची झलक पाहायला मिळाली आहे. त्यामुळे या या बहुरंगी लढती कायम राहिल्यास येथील च चुरस कमालीची वाढणार आहे.