मागील आठवड्यामध्ये कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज छापेमारीमुळे चर्चेत आलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी महाराष्ट्र पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे सध्या खळबळ उडाली आहे. मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.
वानखेडे बोलताना म्हणाले की, त्यांच्यावर बेकायदेशीररित्या पाळत ठेवण्यात येत आहे. तसेच मुंबई पोलीस दलातील काही पोलीस साध्या वेशात वानखेडेंवर पाळत ठेवत असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांकडून मिळाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओशिवरा पोलीस स्थानकातील २ पोलीस समीर वानखेडेंवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर समीर वानखेडेंनी हि तक्रार दाखल केली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील भेट घेऊन सदर प्रकरण त्यांच्या कानी घातले आहे.
२ ऑक्टोबर रोजी मुंबई ते गोवा जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझवर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंच्या नेतृत्त्वात एनसीबीच्या पथकानं छापा मारला होता. क्रूझवरील छापेमारीत ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचा एजन्सीने दावा केला आहे. या प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण १८ जणांना एनसीबीनं अटक केल्याचं सांगितलं. परंतु, क्रूझ ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलेल्या छापेमारीनंतर राष्ट्रवादीकडून एनसीबीवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीनं केलेली कारवाई ही बनावट असल्याचे म्हटले आहे त्याचप्रमाणे यामध्ये भाजप नेत्यांसह अनेक बाहेरचे लोकदेखील सामील होते. पण त्यातील काही राजकीय पुढाऱ्यांच्या नातेवाईकांना सोडण्यात आले. त्यामुळे या प्रकरणी त्यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या फोन रेकॉर्ड्सचा तपास करणं गरजेचं आहे, अशी मागणीही केली.