कोकणाच्या विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच सुरु करण्यात येणार आहे. चिपी विमानतळाच्या श्रेयवादावरून सेना भाजप मध्ये वादंग उठले आहे. आत्ता नवीन मुद्दा उपस्थित झाला आहे, सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उदघाटन समारंभाच्या तारखेवरून वाड सुरु झाला आहे. त्या वादावर बोलताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले कि नागरी हवाई उड्डाण मंत्रालय हे भाजप सरकारच्या अखत्यारीत आहेत. त्याचे मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी जी ९ ऑक्टोबर हि तारीख दिली आणि ती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जाहीर केली तीच तारीख अंतिम असणार आहे. त्यामुळे इतर पक्षांनी श्रेयवादावर विचार करण्यापेक्षा कोकण विकासासाठी सकारात्मक काम करावे असा अप्रत्यक्ष टोला लगावला.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे कि, ९ ऑक्टोबर २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने हा प्रकल्प हाती घेऊन आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करुन या विमानतळाचे काम पूर्ण केले आहे. एकूण २८६ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली. सुमारे ५२० कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते.
आय आर बी, सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. यांना विमानतळ उभारणी, फायनान्स तसेच ऑपरेशन्स साठी लीजवर हे काम देण्यात आले आहे. त्यांनी हा खर्च केला आहे. विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा, रस्ते विकास, संरक्षण भींत या सारखी कामे एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून अंदाजे १४ कोटी रुपये खर्च आला आहे. विमानतळासाठी विकास करार झाले आहेत. विमानतळामुळे कोकणाच्या विकासाला चालना मिळेल, पर्यटन व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. कोकणामध्ये विशेष आकर्षण असलेले स्वच्छ सुंदर समुद्र किनारे आता विमानवाहतुक सुरु झाल्यामुळे अधिकाधिक पर्यटकांमुळे फुल होणार आहेत.