तळकोकण आणि कोकणच्या विकासकार्याला गती मिळवण्याचे प्रमुख कार्य सिंधुदुर्ग चिपी विमानतळामुळे शक्य झाले आहे. विकासाला चालना देणाऱ्या या सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचे लोकार्पण ९ ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डानमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याला वर्ष पूर्ण होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. चिपी विमानतळ उद्घाटनानंतर या विमानतळाला कोणत्या विशिष्ट व्यक्तीचे नाव देण्यात यावे यावर मोठ्या प्रमाणात चर्चा मसलत, वाद प्रतिवाद झाले होते.
अखेर अनेक पक्षांची विविध मते लक्षात घेऊन, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला संसदपटू म्हणून नावलौकिक मिळवलेले माजी खासदार बॅ. नाथ पै यांच्या नावाने नामकरण करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यात बॅ. नाथ पै यांच्या विचारांचा वारसा चालविणारे अनेकजण आहेत. चिपी विमानतळाला त्यांचे नाव देण्यात येणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर चाहते आणि त्यांच्या परिवारातून आनंद व्यक्त होत आहे.
काहींनी विविध नवे सुचवली होती, काहींनी सिंधुदुर्ग विमानतळ नाव द्या, अशीही मागणी केली होती. परंतु, स्थानिक आणि उत्कृष्ट संसदपटू बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी जोर धरत होती. अखेर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याचे निश्चित करण्यात आले. यांच्या बद्दल जाणून घ्यायचं तर, बॅ. नाथ पै उत्कृष्ट संसदपटू होते. त्यांचा परराष्ट्र, अर्थ या विषयांवर अभ्यास देखील सखोल आणि दांडगा होता. त्यांनी लोकसभेच्या राजापूर मतदारसंघातून १९५७, १९६२ आणि १९६७ या तीन निवडणुकीत विजय मिळवत १९५७ ते १९७१ अशी पंधरा वर्षे मतदारसंघाचे नेतृत्व केले.
२५ सप्टेंबर १९२२ हा त्यांचा जन्मदिवस असून, १८ जानेवारी १९७१ ला त्यांचे वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी निधन झाले. त्यांची लोकसभेतील अनेक भाषणे गाजली आहेत. उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने हा प्रकल्प हाती घेऊन आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करून विमानतळाचे काम पूर्ण केले आहे.