25.7 C
Ratnagiri
Tuesday, September 17, 2024
HomeRajapurअखेर जे. के. फाईल्स कंपनी बंद शेकडो कुटुंब बेरोजगार

अखेर जे. के. फाईल्स कंपनी बंद शेकडो कुटुंब बेरोजगार

पालकमंत्र्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन केले.

रत्नागिरीतील जे. के. फाईल्स कंपनी अखेर शुक्रवार दि. ८ सप्टेंबरपासून बंद झाली आहे. कामगार संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी कंपनीसाठी पोषक भूमिका घेतल्याने गुरूवारी कामगारांनी शेवटची शिफ्ट केली. शुक्रवारपासून रत्नागिरीतील ही कंपनी बंद होणार हे निश्चित झाले. उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी कामगारांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्याचा काही अंशी परिणाम झाला असला तरी कंपनी मात्र बंद झाली आहे. जे. के. फाईल्स कंपनीच्या उत्पादनाला मागणी घटल्याने ही कंपनी गेल्या जून महिन्यात बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला.

प्रथम कंत्राटी कामगारांना बाजूला करुन कायमस्वरुपी कामगारांना सात लाख रुपयांचा मोबदला देऊन ऐच्छिक निवृत्ती घेण्यासाठी प्रवृत्त केले जात होते. कामगारांनी बँकांकडून पाच ते दहा लाखापर्यंतची कर्ज घेतली आहेत. त्यामुळे सात लाख रुपयात त्यांची गैरसोयच होणार होती. त्यामुळे कायम कामगारांमधील नेत्यांची समिती नेम ण्यात आली. या समितीमधील पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. त्यानुसार पालकमंत्र्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन केले.

उद्योगमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला कंपनीचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहिले नाहीत; परंतु उद्योगमंत्र्यांनी कामगारांना पंधरा ते वीस लाख रुपयांचा मोबदला मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेऊन पुन्हा कंपनी व्यवस्थापनाशी बैठक घेण्याचा विचार केला होता. गुरूवारी या कंपनीतील कामगारांनी आपली शेवटची शिफ्ट केली. शुक्रवारपासून कंपनी बंद होत असल्याने रत्नागिरीतील शेकडो कुटुंबियांचा रोजगार हरपला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. उद्योगमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कंपनीकडून कामगारांना किमान काही ठोस रक्कम हाती पडावी, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular