गेल्या महिनाभर कामासाठी दररोज काहीवेळ वाहतुकीसाठी बंद करावा लागत असलेला परशुराम घाट आता पुन्हा सुरू करण्यात आला आहे. मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील धोकादायक भागातील काम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर घाट २५ एप्रिल ते २५ मे दरम्यान दररोज सहा तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. अखेर २६ मे पासून परशुराम घाटातून चोवीस तास वाहतूक सुरळीतपणे खुली करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणसह जिल्हाभरातील एस.टी. वाहतूक आता मुंबई-गोवा महामार्गावरून सुरळीत होणार आहे.
चिपळूण नजीकच्या परशुराम घाटातील धोकादायक भागातील चौपदरीकरणाचे काम लवकर मार्गी लागावे म्हणून ठेकेदार कंपन्यांशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांनी परशुराम घाट दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या कालावधीत तब्बल ७०० मीटर लांबीच्या एका लेनचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात यश आले आहे. आगामी १५ जूनपर्यंत आणखी ३०० मीटरचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात येईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात येत आहे.
मुंबई -गोवा महामार्गावरिल हा घाट अत्यंत महत्वाचा मानला जातो. मात्र चौपदरीकरण सुरू झाल्यावर हा घाट दिवसेंदिवस वाहतूकीसाठी अत्यंत धोकादायक बनला होता. त्यामुळे तातडीने युद्धपातळीवर येथील दुरुस्ती काम हाती घेण्यात आले होते. आता पावसाळ्यात या घाटातील वाहतूकीस कोणताही अडथळा न येता सुरळीत सुरू राहील अशी अपेक्षा आहे. मागील पावसाळ्यामध्ये झालेल्या नुकसानामुळे आणि निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीमुळे घाटाची दुरुस्ती प्रथम प्राधान्य देऊन यंदाच्या पावसाळ्यापूर्वी करण्याचे योजण्यात आले होते. आणि आता परिस्थिती पूर्ववत आली असून, घाट सुरु करण्यात आला आहे.