लम्पी स्कीन आजाराचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत आहे. गतवर्षी मरण पावलेल्या ४२९ जनावरांपैकी ४१३ जनावरांच्या पशुपालकांना आर्थिक मदत मिळाली आहे. यासाठी १० कोटी रुपयांचा निधी पशुधन विभागाला प्राप्त झाला होता. लम्पी रोगांना राज्यात थैमान घालत होता. गतवर्षी ३ हजार ५०० जनावरांना लागण झाली होती. त्यापैकी ४२९ जनावरांचा मृत्यू झाला होता. यावर्षीही गेल्या ४ महिन्यात लम्पीची लागण जनावरांना झाल्याचे आढळून आले होते. संगमेश्वर व लांजा तालुक्यात मोठ्याप्रमाणात याची लागण झाल्याचे दिसून आले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत परिस्थिती बरी आहे.
रोगाचा धोका अजूनही टळलेला नाही. लम्पीसदृश लक्षणे दिसून येत असल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हा अनुभव लक्षात घेवून यावर्षी प्रशासन विभाग अलर्ट मोडवर आहे. सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात २ लाख ३५ हजार ५० जनावरे आहेत. त्यापैकी २ लाख २७ हजार २१७ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पशुसंवर्धन विभाग बारीक लक्ष ठेवून आहे. यावर्षी आत्तापर्यंत १. हजार ७५६ जनावरांना लागण झाली होती. त्यापैकी १२२ जनावरांचा मृत्यू झाला होता.
गतवर्षी मृत्यू पावलेल्या जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. आत्तापर्यंत ४१३ जणांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. यासाठी १० कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. हे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. प्रत्येक जनावरामागे ३० हजार तर वासरू असेल तर १६ हजार रुपये मदत देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. असे असतानाही बैलगाड्या शर्यतींचा थरार रंगत आहे. साधारण ३०० ते ४०० जनावरे या स्पर्धेसाठी एकत्र येत आहेत. विशेषतः ज्या तालुक्यात लंपीचे प्रमाण जास्त आहे, त्या तालुक्यात स्पर्धा रंगताना दिसत आहेत.