पश्चिम घाटाच्या विविधांगी वनसंपदेचा वारसा लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या जंगल परिसरामध्ये विविध दुर्मिळ प्राणी-पक्ष्यांसह अन्य वन्यजीवांचे वास्तव्य आढळले आहे. विविध कारणास्तव जखमी होणाऱ्या या वन्यजीवांवर तत्काळ प्राथमिक उपचार करता यावेत या दृष्टीने राजापूर तालुक्यामध्ये वनविभागातर्फे ‘वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्रा’ची उभारणी करण्यात येणार आहे. राजापुरात उभारले जाणारे हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्र ठरणार आहे. वनविभागाच्या जागेमध्ये हे प्राथमिक उपचार केंद्र उभारण्याला प्राधान्य देण्यात येणार असून, त्यामध्ये शहरानजीकच्या धोपेश्वर येथील सुमारे २३ हेक्टर क्षेत्र विचाराधीन आहे.
मात्र अपेक्षित असलेली मुबलक वा विस्तीर्ण प्रमाणात जागा वनविभागाकडे उपलब्ध न झाल्यास महसूल विभागाकडून जागा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. या प्राथमिक उपचार केंद्रातील नियोजन अन् सोयी-सुविधांसह तांत्रिक बाबींच्या उभारणीसाठी सुमारे दीड कोटी रुपयांची आवश्यकता असून, प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे. विविध कारणांमुळे जखमी होणाऱ्या वन्यजीवांवर तत्काळ उपचार करणे गरजेचे असते.
विशेषतः वन्यप्राण्यांवर उपचार करताना कमीत कमी मानवी संपर्क व तातडीने उपचार करून त्यांना लवकरात लवकर मूळ अधिवासामध्ये सोडावे लागते. या उपचारांसाठी वेगळ्या सुविधांची आवश्यकता असते. सद्यःस्थितीमध्ये जखमी वन्यजीवांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यातील उपलब्ध सुविधांचा वापर करावा लागतो. या साऱ्या गोष्टी विचारात घेऊन वनविभागातर्फे वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्राची राजापुरात उभारणी केली जाणार आहे. या केंद्राचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह लगतच्या कोल्हापूर जिल्ह्यालाही उपयोग होणार आहे.