रत्नागिरीच्या विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे काम ५० टक्केवर पूर्ण झाले आहे. ना. उदय सामंत यांनी कन्स्ट्रक्शन कंपनी आणि अधिकाऱ्यांच्यासमवेत बिल्डिंगची पाहणी केली. ३१ मार्च २०२६ ला टर्मिनल बिल्डिंग आणि टॅक्सी वे उड्डाणासाठी सज्ज झाले पाहिजे, अशा सूचना दिल्या आहेत. अलायन्स एअर कंपनीने रत्नागिरी-मुंबई आणि मुंबई-रत्नागिरी विमान वाहतुकीसाठी दिल्लीहून परवानगी घेतली आहे. कोस्टल भागातील अतिशय सुसज्ज विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हावे, असा प्रयत्न असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगच्या कामाची पाहणी आज मंत्री सामंत यांनी केली. या वेळी आमदार किरण सामंत, प्रांताधिकारी जीवन देसाई, न्याती कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी, इतर खात्याचे अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. उदय सामंत यांनी टर्मिनल बिल्डिंगच्या संपूर्ण कामाचा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, रत्नागिरीकरांची अनेक वर्षांपूर्वीची मागणी होती की, रत्नागिरी विमानतळ सुरू झाले पाहिजे.
येथील शेतकरी, सर्वसामान्यांची मुलं, मुली उद्योग व्यवसायासाठी, शिक्षणासाठी मुंबईला जाण्यासाठी कमी दरामध्ये विमान प्रवास करता आला पाहिजे, अशी अपेक्षा होती. त्याला मूर्त स्वरूप आले आहे. ३१ मार्च २०२६ला या विमानतळावरून विमान उड्डाण घेईल, अशा प्रकारे काम करण्याच्या सूचना कन्स्ट्रक्शन कंपनीला दिल्या आहेत, विशेष म्हणजे या विमानतळांच्या अंतर्गत फर्निचर दोन भागात केले जाणार आहे. लाकडाचे फर्निचर असेलच; पण बांबूचादेखील फर्निचरमध्ये मोठ्या प्रम ाणात वापर केला जाणार आहे. बांबूचा वापर करणारे रत्नागिरी विमानतळ हे राज्यातील पहिले असणार आहे, असे सामंत म्हणाले. रत्नागिरी विमानतळामध्ये राज्याच्या उद्योग विभागामार्फत वन डिस्ट्रिक वन प्रोडक्ट यासाठी स्टॉल देणार आहेत. महाराष्ट्र विमान प्राधिकरणाला आम्ही तशी विनंती देखील केली आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना जे खाद्यपदार्थ दिले जाणार ते येथील बचतगटाकडून देण्याचा प्रयत्न असणार आहे, असे उदय सामंत म्हणाले.