देशातील पहिले सागरी विद्यापीठ रत्नागिरी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्याला मंजुरी दिली. ६०० कोटींचा हा प्रकल्प असून, त्यासाठी सुमारे ५० एकर जागेची आवश्यकता आहे. समुद्रावर अभ्यास (रिसर्च) करायचा असेल तर देशातील विद्यार्थ्यांना रत्नागिरीतच यावे लागणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. शासकीय विधी महाविद्यालयालाही शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मी दिलेल्या आश्वासनापैकी शेवटच्या दोन्ही आश्वासनाची वचनपूर्ती झाली आहे, असेही सामंत म्हणाले. झूम मीटिंगद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत उदय सामंत म्हणले, ‘सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यायासाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही होतो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही मागण्या मान्य करत कोकणवासीयांवर असलेले प्रेम पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. सागरी विद्यापीठ हे देशातील पहिले आहे. यामुळे रत्नागिरीचे नाव देशात जाणार आहे. जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. जेव्हा सागरी विद्यापीठ मंजूर होईल, तेव्हा तालुक्यातील ५० एकर शासकीय जागा देऊ, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. शासकीय विधी महाविद्यालयाला देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प देखील २५ कोटींचा आहे. दोन्ही प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीला देखील तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. लवकरच याचा अध्यादेश निघेल.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांची गैरसोय टाळण्यासाठी शनिवारपासून त्याचे विकेंद्रीकरण करून ठिकठिकाणी कॅम्प सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. कालच काही जाचक अटी मुख्यमंत्र्यांनी शिथिल केल्या आहेत. जिल्ह्यातील ५ लाख महिलांनी या योजनेचा फायदा होणार आहे. तो त्यांना मिळावा, यासाठी काम करण्याचे आदेश आढावा बैठकीत दिले आहे. कॅम्प घेताना पावसाचा विचार करून तेथे वॉटर शेड, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदीची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे सामंत यांनी सांगितले.