मिरकरवाडा बंदरावरच मत्स्य विक्रेते स्टॉल लावून बसत असल्याने या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. बर्फ, पाणी, डिझेल, आदी घेऊन येणारे टेम्पो, रिक्षा टेम्पो, दुचाकी, आर्दीची या गर्दीमुळे कोंडी होत होती. याबाबत वाढत्या तक्रारी झाल्यानंतर मत्स्य विभागाने या भागातील अतिक्रमण हटवून पंधरा फुटांचा रस्ता रिकामा केला. मत्स्य विक्रेत्यांची चांगली सोय व्हावी यासाठी सुमारे १ कोटी रुपये खर्च करून मिरकरवाडा येथे मच्छीमार्केट बांधण्यात आले. पालकमंत्री उदय सामंत यांनी मत्स्यखात्याच्या मागणीवरून जिल्हा नियोजनमधून हा निधी दिला होता. सुरुवातीला काही दिवस मत्स्य विक्रेते मार्केटमध्ये बसले; परंतु तिथेही जागेवरून काहीसा वाद सुरू आहे.
कोणी कुठे बसायचे, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे वारंवार बसण्यावरून वाद होतो. हळूहळू हा वाद टाळण्यासाठी एक एक करत आता सर्व मत्स्य विक्रेते रस्त्यावर बसून मत्स्य विक्री करत आहेत. यामुळे नवीन सुसज्ज मच्छीमार्केट ओस पडलले आहे. श्रावण महिना असला तरी अनेक खवय्ये मासे खरेदीसाठी मिरकरवाड्यात जातात; परंतु त्यांना भरपावसात मासे खरेदी करावे लागत आहेत. त्यामुळे मिरकरवाडा प्राधिकरण किंवा मत्स्य विभागाने यावर तोडगा काढून त्यांना शिस्त लावण्याची गरज आहे. शिस्त लागली नाही तर कोट्यवधीचे मच्छीमार्केट ओस पडल्याशिवाय राहणार नाही. मिरकरवाडा प्राधिकरणाच्या नवीन अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो होऊ शकला नाही.
… म्हणून आम्ही बाहेर बसतो – सुमारे ७५ च्यावर ओटे मत्स्य विक्रेत्यांसाठी या मार्केटमध्ये करण्यात आले आहेत; परंतु मार्केटच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरापर्यंतच्याच विक्रेत्यांकडे ग्राहक जातात. मागे बसणाऱ्या विक्रेत्यांकडे येत नाहीत त्यामुळे आमचा व्यवसाय होत नाही, अशा तक्रारी काही विक्रेत्यांच्या आहेत. याकडे प्राधिकरणाने लक्ष घालून त्यांना सोयीचे होईल, अशी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.