मुंबई-गोवा महामार्गावरून शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या पिअरकॅप तोडण्याचे काम अद्याप सुरू आहे. या कामासाठी अजून तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने ही तोडफोड सुरूच राहणार आहे; मात्र मागील तीन अपघाताच्या घटनेनंतर रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेड्स उभारून सुरक्षितपणे काम केले जात आहे. चिपळुणातील उड्डाणपुलाच्या कामात तीन वर्षांपासून सातत्याने अडचणी येत आहेत. या पुलासाठी सुरुवातीच्या आराखड्यानुसार एकूण ४६ पिलर उभारण्यात आले होते. त्यानंतर पुढील कामाला वेग घेत असतानाच १६ ऑक्टोबर २०२३ ला या पुलाचा बहादूरशेखनाका येथे काही भाग कोसळला होता.
पूल कोसळल्यानंतर उभारणीतील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या. त्यावर केंद्रातून तज्ज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी करण्यात आली. या समितीच्या सूचनेनुसार, राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाच्या डिझाईनमध्ये बदल केले. यामध्ये पूर्वीच्या पिअरमधील ४० मीटरचे गाळे रद्द करून त्यामधील अंतर कमी करण्यासाठी २० मीटरवर नव्याने पिअर उभारले जात आहेत. या नव्या रचनेनुसार २८२ पायलिंग उभारले जाणार आहेत. आतापर्यंत २४३ पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे. महिनाभरात उर्वरित ३९ पायलिंगचे काम पूर्ण केले जाणार आहे.
गेले महिनाभर पिअरकॅप तोडाफोडीचे काम सुरू आहे. भरपावसात अत्यंत घाईघाईने हे काम केले जात आहे. काही दिवसांपूर्वी एका पिअरची कापलेली एक बाजू क्रेनच्या साहाय्याने खाली उतरवण्याचे काम सुरू असताना अपघात घडला होता. यामध्ये दोन कामगार गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर आमदार शेखर निकम यांनी सुरक्षेबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे कंपनीने पिअरकॅप तोडण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारून उपाययोजना केल्या आहेत.