मिरकरवाडा येथील मच्छीमार्केट पुन्हा ओस पडू लागले आहे. रस्त्यावर बसल्यानंतर मत्स्य विभागाकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी स्टॉलधारकांनी मच्छीमार्केटच्या मागे स्टॉल मांडले आहेत. पाण्यामुळे तेथे होणाऱ्या चिखलातूनच मार्ग काढत खवय्यांना मासळी खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले मच्छीमार्केट पुन्हा रिकामे पडले आहे. ज्या उद्देशाने हे मार्केट उभारले होते तो उद्देशच फोल ठरू लागला आहे. मत्स्य विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील मिरकरवाडा हे मोठे मत्स्य बंदर आहे. माशांच्या खरेदी-विक्रीतून दर दिवशी कोट्यवधीची उलाढाल होणारे हे बंदर आहे. यापूर्वी मिरकवाडा जेटीच्या रस्त्यावर शेकडो मत्स्य विक्रेते अतिक्रमण करून बसत होते. त्यामुळे वाहतुकीलाही मोठा अडथळा होत होता. वाढत्या तक्रारीनंतर मत्स्य विभागाने पोलिस बंदोबस्तात हे सर्व अतिक्रमण हटवले. रस्ता सुमारे १५ फूट रिकामा केला आहे. त्यामुळे येथील दळणवळण सोपे झाले; परंतु हे मत्स्य विक्रेते स्टॉलधारकांना पर्यायी व्यवस्था म्हणून मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजनमधून १ कोटी रुपये देऊन मच्छीमार्केट उभारण्यात आले.
त्यामध्ये सुमारे ७० च्या वर ओटे बांधण्यात आलेले आहेत. स्थानिक मत्स्य विक्रेत्यांना देण्यात आले. तेथे पाणी, लाईट, आदींची व्यवस्था केली आहे. त्यामुळे मिरकरवाडा बंदरावरील दुर्गंधी कमी होईल, अशी अपेक्षा होती; परंतु विक्रेत्यांना रस्त्यावर बसण्याची सवय लागल्याने आणि काही ओठे आत असल्यामुळे त्या ठिकाणी बसण्यास कोणी स्टॉलधारक तयार नाही. विक्रते पुन्हा रस्त्यावर येऊन बसू लागले आणि मार्केट ओस पडले. मत्स्य विभागाकडे याची तक्रार झाल्यानंतर मत्स्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला. विक्रेत्यांना पुन्हा मार्केटमध्ये बसवण्यात आले; परंतु आता कारवाई टाळण्यासाठी विक्रेत्यांनी दुसरा पर्याय निवडला आहे. जवळपास ८० ते ९० टक्के विक्रेते आता मच्छीमार्केटच्या मागच्या बाजूला असलेल्या जागेत स्टॉल टाकून बसत आहेत. पुन्हा मच्छीमार्केट ओस पडले असून, मत्स्य विभागाचा उद्देश असफल होताना दिसत आहे. मत्स्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे, असे अनेक ग्राहकांचे मत आहे.
खरेदीसाठी चिखलातून काढावा लागतो मार्ग – मच्छीमार्केटच्या मागच्या बाजूला बहुतेक सर्व विक्रेत्यांनी स्टॉल मांडले आहेत. विक्रेते पाणी, बर्फाचा वापर करत असल्याने मोठ्या प्रमाणात तेथे चिखल झाला आहे. या चिखलातून वाट काढत मासळी खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे खवय्ये नाराज असून, मत्स्य विभागाने कारवाई करून चांगली सुविधा असलेल्या मच्छीमार्केटमध्ये विक्रेत्यांना बसवावे, अशी मागणी होत आहे.