तमिळनाडूच्या फेंगल या चक्रीवादळामुळे हवामानात पूर्णपणे बदल होऊन थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन दिवसांत हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या गिम्हवणे येथील हवामानखात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मच्छीमारांनीही खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाण्याचे टाळले आहे. वादळी परिस्थितीमुळे गेल्या आठवड्यात पारा ८.८ अंश सेल्सिअसवर आला होता. संपूर्ण तालुक्यात हुडहुडी भरली होती. आंबा, काजू बागायतदार सुखावला होता. कलमांना मोहोर यायला सुरवात झाली होती; परंतु गेले दोन दिवस किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. रविवारी किमान तापमान ११.१ अंश झाले होते. सोमवारी (ता. २) किमान तापमान आणखी दोन अंशाने वाढून १३.८ अंश सेल्सिअसइतके झाले आहे. वातावरणात थंडीचे प्रमाण कमी होऊन उष्म्याचे प्रमाण वाढले आहे तसेच पूर्व किनारपट्टीवरील वादळी परिस्थितीचा परिणाम येथील किनारपट्टीवर दिसून येत आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ आणि धुके दिसून येत होते.
दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या गिम्हवणे येथील हवामानखात्याने दिलेल्या जिल्ह्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार, सध्याच्या वातावरणात फेंगल चक्रीवादळामुळे बदल होत आहेत. उत्तर किनारपट्टी तमिळनाडू आणि पदुच्चेरीच्या परिसरावर असलेल्या चक्रीवादळ फेंगलने पश्चिमेकडे जवळपास सरकून २ डिसेंबरला सकाळी ५.३० वा. उत्तर अंतर्गत तमिळनाडूवर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर केले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र ३ डिसेंबरच्या सुमारास उत्तर केरळ- कर्नाटक किनारपट्टीजवळ दक्षिण-पूर्व आणि लगतच्या मध्य-पूर्व अरबी समुद्रात उगम पावण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यात पुढील दोन ते दिवस राहणार असल्याने वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. ३ आणि ४ डिसेंबरला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बदलेल्या वातावरणात शेतकऱ्यांनी वेळीच पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. हे ढगाळ वातावरण दोन ते तीन दिवसात निवळण्याची शक्यता आहे, अशी माहिती दापोली कोकण कृषी विद्यापिठाच्या गिम्हवणे येथील हवामानखात्याचे अधिकारी डॉ. विजय मोरे यांनी दिली.
मासेमारी जवळच – हर्णे व आंजर्ले खाडीतील नौका फेंगल चक्रीवादळामुळे शासनाकडून सर्तकतेचा इशारा मिळाल्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाता जवळच मिळणाऱ्या मासळीसाठी (कोळंबी-टायनी) मच्छीमारी करत आहेत, अशी माहिती येथील मच्छीमार रामकृष्ण पावसे यांनी सांगितले.