गेले दोन महिने बंद असलेली मासेमारी १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे हर्णे बंदरासह आसपासच्या मच्छीमार वसाहतीत सध्या होड्यांची डागडुजी, रंगकाम, इंजिन तपासणी, जाळींची विणाई, खाद्य व इंधन साठवणूक, बर्फाची तयारी, खलाशांची जमवाजमव अशा कामांत मच्छीमार व्यग्र आहेत. प्रत्येक होडी समुद्रात उतरवण्यापूर्वी तिची पूर्णपणे तयारी आणि सुरक्षितता पाहणे अत्यंत आवश्यक असते. कोळी समाज धार्मिक परंपरांशी निष्ठावान असल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला श्रावण महिना सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी श्रावण महिन्यातील सप्ताह सुरू झाले आहेत. विशेष पूजाअर्चा, खेमदेवाला प्रार्थना आणि शुभ मुहूर्त ठरवूनच होड्या समुद्रात सोडल्या जातात. समुद्र शांत राहावा, भरपूर मासळी मिळावी आणि कोणतेही अपघात घडू नयेत यासाठी हर्णैर्णे, पाजपंढरी येथील मच्छीमार समाजाकडून विधिवत व धार्मिक कार्यक्रम करण्याची तयारीही सुरू झाली आहे.
मागील हंगामात मे महिन्याच्या २० तारखेपासून अचानक आलेल्या पावसाने मच्छी व्यवसायाला फटका बसलेला होता. त्यामुळे मच्छीमार हवालदिल झाले होते. मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. सामान्यतः १५ ऑगस्टच्या आसपास मासेमारी हंगाम सुरू होतो; मात्र यंदा पावसाने समाधानकारक लवकर हजेरी लावून नंतर गायब झाला; परंतु कालपासून पावसाने सुरुवात केल्यामुळे यंदाच्या हंगामावर पावसाचे सावट दिसत आहे. हवामान विभागाकडून, अजून ३ दिवस मुसळधार पाऊस राहील, असे जाहीर केल्यामुळे १ ऑगस्टपासून वातावरण पोषक होईल, अशी शक्यता आहे. त्यासाठी तीन दिवस आधी मासेमारीला जाण्यासाठी मच्छीमार सज्ज झाले आहेत.
हवामानाचा अस्थिरपणा – मागील काही वर्षांपासून वातावरण अस्थिर राहिल्यामुळे मच्छीमारांना नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी, मत्स्यव्यवसाय संकटात सापडला आहे. मासेमारीबंदीच्या काळात होणारा खर्च, होडी डागडुजीचे भांडवल आणि घरखर्च चालवताना अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण वाढला आहे.
सरकारकडून मदतीची अपेक्षा – शासनाने जाहीर केलेल्या मासेमारीबंदीचे काटेकोरपणे पालन करूनही मच्छीमारांना कोणतीही आर्थिक मदत दिली जात नाही. सरकार ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी मदत योजना आणते त्याप्रमाणे मच्छीमारांसाठी विशेष आर्थिक पॅकेजची गरज आहे. ती लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे.