१९ जानेवारी (प्रतिनिधी) समुद्रात वाहणाऱ्या उत्तरेकडील जोरदार वाऱ्यामुळे मासळी स्थलांतरित झाली आहे. हर्णे बंदरातून मच्छीमारासाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारी बोटींना गेल्या ४ दिवसांपासून रोजच्या खर्चाइतकीही मासळी मिळेनाशी झाली आहे. शिवाय उलट वाऱ्यामुळे रापणाचे रोप तुटून मासेमारी करणाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे हर्णे बंदरात मच्छीमारी करणाऱ्या मासेमारांनी मासेमारी न करता समुद्रातील परिस्थिती निवळेपर्यंत बोटी किनाऱ्याला लावून ठेवण्याला प्राधान्य दिले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर हे मासेमारीसाठी जिल्हयात दुसऱ्या क्रमांकाचे बंदर ओळखले जाते. अशा या बंदरात सर्व प्रकारच्या साधारणपणे साडेआठशेच्या आसपास मासेमारी बोटी मासेमारीचा व्यवसाय करतात. गेल्या ४ दिवसापासून वातावरणातील हवामानाच्या बदलाचा फटका हा येथील मासेमारांना चांगलाच बसला आहे. मागील चार दिवसांपासून हर्णे येथील समुद्रात उत्तरेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमारी बोटींना जाळयात मासळीच मिळत नसल्याने बोटी मालकांच्या अंगावर खर्च पडत आहे. त्यामुळे मासेमारांनी परिस्थिती निवळेपर्यत किनाऱ्यावर बोटी लावणे पसंत केले आहे.
दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात अगदी दाभोळ, बुरोंडी, आडे, उटंबर, केळशी अशा आजूबाजूच्या गावातील मिळून साधारणपणे साडेआठशेच्या आसपास मासेमारी नौका मासेमारी व्यवसाय करतात. गेल्या चार दिवसापासून समुद्रातील वातावरणात झालेल्या बदलांमुळे समुद्रात मासेमारी साठी गेलेल्या मच्छिमारांना मासेच मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या बोटी समुद्र किनाऱ्यावर उभ्या करून ठेवलेल्या आहेत. अशा या अचानकपणे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मच्छिमार चांगलाच अडचणीत सापडला आहे. मासेमारी करणाऱ्या नौकाना इंधन, खलाशांचे रेशन पाणी भरून देणे त्याचबरोबर खलाशांचे आठवड्याचे पगार देण्याचा खर्च असतो. हा खर्चही सुटत नसल्याचे पाजपंढरी येथील रहिवासी आणि हर्णे बंदरात मच्छिमारी व्यवसाय करणारे मच्छिव्यवसायिक बोट मालक श्री. विष्णू तबीब यांनी सांगितले. त्यांच्या मते अजून किमान तीन दिवस तरी अशीच परिस्थिती राहील असा त्यांनी अंदाज वर्तवला आहे.

