गेले दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेली अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्यामुळे वातावरण अजून शांत झालेले नाही. त्यामुळे हर्णे बंदरातील मच्छीमारांचा १ ऑगस्टचा मासेमारीचा मुहूर्त टळणार आहे. समुद्राला उधाण आले असून, जोरदार वाऱ्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व नौका आंजर्ले खाडीतच उभ्या करून ठेवल्या आहेत. ६ ऑगस्टपर्यंत वातावरण निवळले तर मच्छीमार बांधव नौका समुद्रात लोटतील, असे मच्छीमार बांधवांनी सांगितले. शासनाने जाहीर केलेला मासेमारी बंदीचा काळ ३१ जुलैला संपुष्टात येणार आहे. १ ऑगस्टपासून मासेमारीला प्रारंभ होणार आहे; मात्र गेले आठ दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे.
समुद्र खवळलेला असून, जोरदार वारा वाहत आहे. त्याचा फटका या प्रांरभाला बसणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी नौका समुद्रात लोटलेल्या नाहीत. या नौका अजूनही आंजर्ले खाडीतच उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. हर्णे बंदर जिल्ह्यातील मोठे बंद आहे. या बंदरात मासेमारी करणाऱ्या परवानाधारक किमान ८०० ते ९०० लहान-मोठ्या नौका आहेत. या नौका १ ऑगस्टपासून मच्छीमारीला जाण्यासाठी आठ दिवस अगोदर तयारी करतात; परंतु यावर्षी बदललेल्या हवामानाचा फटका मच्छीमारांना बसणार आहे. बहुतांशी मच्छीमारांनी समुद्रात जाण्याची तयारी केली आहे.
काही मच्छीमारांची डागडुजीची तयारी सुरू असल्याचे मच्छीमार रामकृष्ण पावसे यांनी सांगितले. मासेमारीच्या काळात सुगीचे दिवस हर्णे बंदरात सकाळी आणि संध्याकाळी असा दोनवेळा मासळीचा लिलाव होतो. त्यातून लाखोंची उलाढाल होते. या ठिकाणी मासळी खरेदीसाठी पर्यटकांचीही झुंबड असते. या उलाढालीवरच येथील दैनंदिन व्यवसाय अवलंबून असतात. त्यामुळे या बंदरात मासळीची आवक मोठ्या प्रमाणात आल्यास बाजारपेठेतील सर्व प्रकारच्या व्यवसायाला ऊर्जितावस्था येते. त्यामुळे मासेमारी काळात येथे सुगीचे दिवस असतात.