28.9 C
Ratnagiri
Friday, February 13, 2026

भारत बंदला प्रतिसाद, रत्नागिरीत बँक कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी, जोरदार निदर्शने

देशातील ११ केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या गुरूवारच्या...

चिपळूण शहराच्या निळ्या, लाल पूररेषेच्या फेरसर्वेक्षणासाठी समिती

राज्यभरातील पूरबाधित शहरांमध्ये नद्यांलगत मारलेली निळ्या व...

चिपळुणात आजपासून साहित्य संमेलन उद्या उपमुख्यमंत्री तर रविवारी मुख्यमंत्री येणार

चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवण येथील कृषिभूषण डॉ. तानाजीराव...
HomeRatnagiriविहिरीत कोसळले पाच रानगवे, मध्यरात्री रेस्क्यू ऑपरेशन राबवत केली सुटका

विहिरीत कोसळले पाच रानगवे, मध्यरात्री रेस्क्यू ऑपरेशन राबवत केली सुटका

विहीर सुमारे १५ ते २० फुट खोल व अंदाजे १५ फूट व्यासाची असून पूर्णपणे कोरडी असल्याचे आढळले.

संगमेश्वर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून गवे (रानरेडे) यांचा मुक्त संचार सुरू असून मानवी वस्तीत त्यांचा संचार सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण ही पसरलेले दिसत आहे. या पार्श्वभुमीवर लोवले (ता. संगमेश्वर,) या गावी बुधवारी (दि. ११ फेब्रुवारी २०२६) रात्री उशीरा घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. शेतातील कोरड्या व खोल विहिरीत एक दोन नव्हे तर तब्बल ५ रानगवे पडल्याच्या वृत्तांने गावकऱ्यामंध्ये एकच खळबळ उडाली. रात्रीची वेळ असूनही ही बातमी गावात पसरली आणि अनेकांनी त्या विहिरीकडे धाव घेतली, एक नर, एक मादी व त्यांची तीन पिल्ले असे एकूण ५ रानगवे विहिरीत पडल्याची खबर मिळताच वनविभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत थरारक पण यशस्वी बंचावमोहीम राबवली. या सर्वांना सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळाले.

रात्री ११.३० वा….. – अधिक वृत्त असे की बुधवारी रात्री सुमारे ११.३० वाजता लोवले गावातील संतोष प्रदीप खेडेकर यांच्या शेतातील पडीक व कोरड्या . विहिरीत रानगवे पडल्याची माहिती कृषी सहाय्यक समीर दोरखडे यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर-देवरुखचे पथक आवश्यक साहित्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

बॅटरीच्या उजेडात पाहणी – प्रत्यक्ष पाहणी केली असता संबंधित विहीर सुमारे १५ ते २० फुट खोल व अंदाजे १५ फूट व्यासाची असून पूर्णपणे कोरडी असल्याचे आढळले. बॅटरीच्या उजेडात पाहणी केली असता दोन पूर्ण वाढ झालेले रानगवे (एक नर व एक मादी) आणि त्यांची तीन लहान पिल्ले विहिरीत घाबरलेल्या अवस्थेत उभी असल्याचे दिसून आले. विहिरीची उंची व तिरपा कडा असल्याने त्यांना स्वतःहून बाहेर पडणे शक्य नव्हते.

वनविभागाची रेस्क्यू मोहिम – परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने धाडसी निर्णय घेत जेसीबीच्या सहाय्याने विहिरीच्या एका बाजूने माती टाकून उतार (रॅम्प) तयार करण्याचे काम हाती घेतले. अत्यंत काळजीपूर्वक आणि संयमाने ही प्रक्रिया पार पाडण्यात आली, जेणेकरून रानगव्यांना कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली. रॅम्प तयार होताच काही वेळातच प्रथम पिल्लांनी आणि त्यानंतर नर-मादी रानगव्यांनी नैसर्गिक मार्गाने बाहेर येत सुरक्षितपणे विहिरीबाहेर पाऊल ठेवले.

रात्री दीड वाजता मोहिम फत्ते – बुधवारी रात्री १.३० वाजेपर्यंत ही संपूर्ण बचावमोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली. विशेष म्हणजे कोणत्याही रानगव्याला इजा अथवा दुखापत झाली नाही. बाहेर आल्यानंतर सर्व रानगव्यांनी सुटकेचा श्वास टाकत शांतपणे ‘जंगलाच्या दिशेने रवाना झाली.

यांनी केली सुटका – ही संपूर्ण रेस्क्यू मोहीम विभागीय (चिपळूण) वन अधिकारी रत्नागिरी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगंड व परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपाल संगमेश्वर-देवरुख सागर गोसावी, वनरक्षक फुणगूस आकाश कडुकर, वनरक्षक आरवली सुरज तेली व वनरक्षक साखरपा सहयोग कराडे यांनी ही मोहिम यशस्वी केली.

ग्रामस्थांचे सहकार्य – रेस्क्यूदरम्यान मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी संयम राखत वनविभागाला सहकार्य केले. नागरिकांची जागरूकता आणि वनविभागाची तत्परता यामुळे पाचही रानगव्यांचे प्राण वाचले याविषयी समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

नागरिकांना आवाहन – तालुक्यात सध्या रानगव्यांचा वावर वाढत असून त्यांच्या मुक्त संचारामुळे शेतजमिनी, पडीक विहिरी व मोकळ्या जागांमध्ये अपघाती घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, विहिरींना सुरक्षित कुंपण करावे आणि वन्यप्राणी दिसल्यास घाबरून न जाता त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वनविभागाच्या अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी केले आहे. वन्यजीव संवर्धन आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्वाचे हे एक सकारात्मक उदाहरण ठरले असून लोवले येथील ही बचावमोहीम तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular