कोकणात स्वत:चे घर असावे, किंवा काहीतरी दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करावी यासाठी अनेक दुसर्या मोठ्या शहरात राहणारी मंडळी कोकण अथवा ग्रामीण भागामध्ये जिथे शहरासारखी गजबज नसून शांतता असेल अशा ठिकाणी जागा अथवा घरासाठी इन्व्हेस्टमेंट करून ठेवतात. पण काही वेळा अशा अनेक खोट्या साईटद्वारे फसवणुकीचे प्रकार घडत असतात.
काहीवेळा एकच जागा इतर दोघा तिघांना परस्पर विकणे, खोट्या कागदपत्रांच्या आधारे अपहार करणे, पैसे आधीच स्वीकारून मग जागेचा अथवा सदनिकेचा ताबा न देणे अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक केस सध्या घडली आहे. रत्नागिरीतील गिरीष ओसवाल व महेश नवाथे या दोघांविरूद्ध मुळचे चवंडे वठार येथिल असलेले पण सध्या मुंबई येथे राहत असलेले फिर्यादी प्रविण मनोहर चवंडे यांनी सदनिकेसाठी रक्कम गुंतवून देखील प्रत्यक्षात सदनिकेचा ताबा देण्यातच आला नाही, म्हणून पाच लाख सत्तेचाळीस हजारांची फसवणूक झाल्याबद्दल चवंडे यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
मौजे पडवेवाडी येथील बांधण्यात आलेल्या प्रकल्पात, शांती एफ. ओसवाल प्लाझा या संकुलनात ५८२ स्क्वे. फूट. चा सदनिका क्र. ०५ दुसरा मजला, येथे फिर्यादी चवंडे यांनी शांती के. एफ. ओसवाल प्लाझाचे विकासक गिरीष ओसवाल व त्यांचे प्रोजेक्ट हेड पार्टनर महेश नवाथे यांनी देण्याबाबत करार केला होता.
त्याबाबतीतील त्यांनी बुकींग व इतर स्वरूपात ५ लाख ४७ हजार रुपये फिर्यादी यांच्याकडून स्विकारले होते. मात्र प्रत्यक्षात सदनिका मात्र हस्तांतरित करण्यात आली नाही. त्यामुळे या व्यवहारात आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार चवंडे यांनी शहर पोलीस स्थानकात दिली आहे.