नाटे-ठाकरेवाडी पुलावरून पाणी गेल्यामुळे नाटे गावाशी काहीकाळ संपर्क तुटला होता. तसेच खेडमधील नारंगी, चोरद व जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर तालुक्यात रामपेठ, माखजन आणि बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले होते. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ९९.३४ मिमी पाऊस झाला आहे. त्यात मंडणगड ८३.९०, दापोली ९०, खेड ९६.५०, गुहागर ९०.९०, चिपळूण ८४.६०, संगमेश्वर १२१.५०, रत्नागिरी १३२.४०, लांजा ९१.३०, राजापूर १०२.३० मिमी पाऊस झाला. आज दिवसभर सर्वत्र पाऊस सुरूच आहे.
पावसाचा तडाखा खेड तालुक्याला बसला असून, पुराचे पाणी खेड-दापोली रस्त्यावर आले होते. त्यामुळे पहाटेपासून वाहतूक ठप्प होती. अखेर, प्रशासनाने येथील वाहने कुंभारवाडामार्गे वळवली. दिवसभर विश्रांती न घेता पाऊस कोसळत होता. खेड शहरात जगबुडीचे पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. संगमेश्वर तालुक्यातील बावनदी, शास्त्री, सोनवी या नद्यांनी धोकापातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी बाजारपेठेत शिरले होते. सलग तिसऱ्यांदा पुराचे पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.
सकाळी मुसळधार पावसामुळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना लवकर सोडण्यात आले. तसेच नदीकाठी असलेल्या ग्रामपंचायतींना सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला होता. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्यामुळे नारंगी नदीपात्रातील पाणी किनारी भागात शिरले होते. राजापूर तालुक्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांचे पाणी जवाहर चौकात पिकअप् शेडपर्यंत आले होते. त्यामुळे जवाहर चौकाकडे येणारी एसटी वाहतूक बंद ठेवली होती. पाणीपातळी वाढत असल्यामुळे व्यापारी व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राजापूर शहरातील बंदरधक्का, मुन्शीनाका रोड, शीळ-चिखलगाव-गोठणे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक दोन दिवस ठप्प आहे.
अर्जुना नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह वरची पेठ परिसरातील रस्त्यापर पाणी आले आहे. तसेच पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. नाटे-ठाकरेवाडी पुलावरून अतिवृष्टीमुळे पाणी गेल्यामुळे दुपारी ठाकरेवाडीचा नाटे गावाशी संपर्क तुटला होता. त्याला पर्यायी मार्ग नसल्यामुळे काही काळ नाटेकडे आलेले ग्रामस्थ पूर ओसरण्याची प्रतीक्षा करत होते. या प्रकाराबाबत तहसीलदार शीतल जाधव यांना तेथील ग्रामस्थांनी पूल लवकरात लवकर व्हावा, असे निवेदन दिले.