काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गेले तीन ते चार दिवस मुसळधारेने कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी दिवसा व रात्री चांगलाच जोर धरल्याने मंगळवारी पहाटे राजापूर शहरातील अर्जुना व कोदवली नद्यांना पूर आला. या पूराच्या पाण्याने राजापूर शहरातील जवाहर चौकाला वेढा देत सकाळी शिवस्मारकापर्यंत धडक मारली. पावसाचा वाढता जोर आणि झपाट्याने वाढणारे पुराचे पाणी बाजारपेठेत घुसले. बाजारपेठेसह छत्रपती शिवाजी महाराज रोड, वैशंपायन पूल, बंदरधक्का, मुन्शीनाका, वरचीपेठ रस्ता पूराच्या पाण्याखाली गेला पूराच्या पाण्यात जवाहर चौकातील अनेक टपऱ्या पाण्याखाली गेल्या. ‘तर राजापूर ते शिळ-गोठणेदोनिवडे मार्गावरही अर्जुनेच्या पुराचे पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मुसळधार पाऊस व पूरामुळे मंगळवारी राजापूर शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान मंगळवारी सायंकाळी उशीरापर्यंत पाणी न ओसरल्याने नागरिकांनी रात्र जागवून काढण्याची तयारी केल्याचे दिसत होते.
मुसळधार पावसाने शहरातील नदीकिनाऱ्यालगत असणारे व्यापारी व नागरीकांनी आपले सामान सुरक्षितस्थळी हलविले आहे. त्यामुळे कोणतीही वित्तहानी झाली नाही. शहरात पुराचे पाणी शिरल्याचे कळताच राजापूर तहसिलदार विकास गंबरे, पोलीस निरीक्षक अमित यादव माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे, नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र जाधव यांनी शहरात पूरस्थितीची पाहणी केली व कायम देखरेख ठेवली होती. प्रशासनाकडून तातडीने फायबर बोट तैनात ठेवत सर्व विभागांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. सोमवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला होता. दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे अर्जुना व कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळे प्रशासनाकडून अर्लट जारी करण्यात आला होता. त्यातच हवामान विभागाने मंगळवारी रेड अलर्ट जाहीर केल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता होती. ती खरी ठरली. शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली होती.
जवाहर चौकात पाणी – सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने अर्जुना व कोदवली नद्यांना पूर आला व या पूराचे पाणी शहर बाजारपेठेत शिरले. पूराच्या पाण्याने मंगळवारी सकाळी जवाहर चौकात घडक देत शिवस्मारकापर्यंत मजल मारली. तर शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. मंगळवारी पहाटे पूराच्या पाण्याचा जोर जास्तच वाढल्याने राजापूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील माल सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरूवात केली होती. शहरातील शिवाजी पथ रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील व्यापाऱ्यांनी व रहिवाशांनी आपले सामान सुरक्षित स्थळी हलविले.
एसटी वाहतूक बंद – जवाहर चौक, छत्रपती शिवाजी महाराज रोड परिसरातील अनेक टपऱ्या व दुकाने पाण्याखाली गेली. जवाहर चौकात पुराचे पाणी भरल्याने जवाहर चौकातील एसटी वाहतूक बंद करण्यात आली. तर राजापूर-शिळ-गोठणेदोनिवडे मार्गावरही पूराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुकही बंद करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी शहराच्या मध्यवर्ती भागात शिरलेले पूराचे पाणी सायंकाळपर्यंत ठाण मांडून होते. त्यातच पावसाचा जोर कायम राहिल्याने पाणी ओसरण्याची प्रतिक्षा नागरिक व व्यापाऱ्यांना होती.
प्रशासन सतर्क – गेले तीन ते चार दिवस संततधार पडणाऱ्या पावसामुळे पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे. सोमवारी दिवसभर व रात्री तसेच मंगळवारी सकाळपासून नगरपरिषद प्रशासनाने भोंगा वाजवून नागरीकांना अर्लट केले होते. तर राजापूर तहसिलदार विकास गंबरे, पोलीस निरीक्षक अमित यादव, नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र जाधव हे जातिनिशी पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पोलीस प्रशासनासह नगरपरिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे कर्मचारीही सतर्क होते. तालुक्यातील वाटूळ मांडवकरवाडी, सौंदळ, फुफेरे, आंगले रस्ता मार्ग पाण्याखाली गेला होता. मात्र पाण्याची पातळी कमी झाली आहे. रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
ग्रामीण भागालाही तडाखा – गेले काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने तालुक्याच्या ग्रामीण भागालाही तडाखा दिला आहे. ग्रामीण भागातील नदीनाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील माडबन वरीवाडा येथील श्रीमती कविता किसन साखरकर यांच्या घरावर फणसाचे झाड पडून घराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.