वादळीवाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने राजापुरात अधुनमधून विश्रांती घेतली असली तरी गुरूवारी रात्रभराच्या पावसाने राजापूर शहरात शुक्रवारी पहाटे पुराचे पाणी घुसू लागले. शुक्रवारी सकाळी पूराच्या पाण्याने जवाहर चौकातील ध्वजस्तंभाला वेढा घालून दिवसभरात नदीपात्रालगतच्या व्यापारी आणि नागरिकांचे टेन्शन चांगलेच वाढविले. गुरूवारी मध्यरात्रीच अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळे शुक्रवारी पहाटे जवाहर चौक पाण्याखाली गेला होता. मात्र शुक्रवारी हळूहळू हे पाणी ओसरले असले तरी पुन्हा येण्याचा धोका नाकारता येत नाही.
यंदाच्या जुलैमधील वादळी पावसाची शहरातील भटाळी भागावर मात्र अवकृपा दिसून आलेली आहे. गेल्या पंधरा दिवसात केवळ भटाळीच नव्हे तर आंबेवाडी व लगतच्या भागात झाडे कोसळून हा भाग तब्बल ८० तासांपेक्षा अधिक काळ वीजेविना राहिल्याने तेथील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला. अशीच काही स्थिती शुक्रवारी बाजारपेठेलाही सहन करावी लागली. यामुळे दुध व फ्रिजमध्ये ठेवावे लागणारे पदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.
सलग तिसऱ्या रविवारी पाणी – सलग तिसऱ्या रविवारी पडलेल्या मुसळधार पावसाने शहरात पुराचे पाणी शिरले होते. मात्र सोमवारपासून पावसाने उसंत घेतली असली तरी सोसाट्याच्या वा-यासह पाऊस सरींवर बरसत होता. गुरूवारी दिवसभर पाऊस सरींवर बरसत असल्याने संध्याकाळी शहरातून वाहणा-या कोदवली व अर्जुना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे पुराची शक्यता लक्षात घेऊन नागरिक व व्यापारीवर्गाने नेहमी प्रमाणेच दक्षता घेतली होती.
पहाटे पाणी घुसले – मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढल्याने शुक्रवारी पहाटे पूराचे पाणी जवाहर चौकाच्या दिशेने यायला सुरूवात झाली. शुक्रवारी सकाळी संपूर्ण जवाहर चौक पाण्याखाली गेला होता. त्याचवेळी शहरातील चिंचबांधम ार्गे शशीळ गोठणेकडे जाणारा रस्तांही पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली. शहराच्या अन्य भागातही काही ठिकाणी पुराचे पाणी शिरले. शुक्रवार सकाळपासून पावसाने पूर्णतः उघडीप घेत अनेक दिवसांनी उन पडले असले तरी पुराच्या शक्यतेने जवाहर चौकातील एसटी सेवा बंद ठेवण्यात आली त्यामुळे प्रवाशांना रिक्षां शिवाय अन्य कोणताही आधार नव्हता.