24.4 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeRatnagiri'कर्ला-आंबेशेत' मिरवणुकीवर पर्जन्यासह पुष्पवृष्ट

‘कर्ला-आंबेशेत’ मिरवणुकीवर पर्जन्यासह पुष्पवृष्ट

अतिशय शिस्तबद्ध, नियोजनबद्ध ही मिरवणूक सकाळी लक्ष्मीचौक येथून निघाली.

शहराजवळील कर्ला-आंबेशेत गावातील १२०हून अधिक घरगुती गणपतींचे बुधवारी (ता. २७) सकाळी भव्यदिव्य मिरवणुकीने स्वागत करण्यात आले. लक्ष्मीचौक येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. पावसाचे सावट असले तरीही ग्रामस्थांचा उत्साह दांडगा होता. सुमारे सहा तासांनंतर ही मिरवणूक कर्ला, आंबेशेत गावात पोहोचली. ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले तरुण, आकर्षक सजावटीने सजलेल्या गाड्यांमधून लाडक्या गणरायाला घरी नेण्यात आले. कर्ला-आंबेशेत गणेश आगमन मिरवणुकीचे हे ४०वे वर्ष होते. विसर्जनाच्या मोठमोठ्या मिरवणुका निघतात; परंतु आगमनाची ही मिरवणूक नावीन्यपूर्ण आहे. दरवर्षीप्रमाणे दोन्ही गावच्या ग्रामस्थांची एकत्रित अशी दिमाखदार मिरवणूक काढली.

अतिशय शिस्तबद्ध, नियोजनबद्ध ही मिरवणूक सकाळी लक्ष्मीचौक येथून निघाली. मिरवणुकीमध्ये सुमारे सव्वाशेहून अधिक लहान-मोठ्या गणेशमूर्तीचा समावेश होता. विविध वाहने, ढोलताशे पथके, झांजपथक, महिला लेझिम पथक, शिवशक्ती चक्री भजन मंडळ या मिरवणुकीत लक्ष्यवेधी ठरले. जल्लोषी वातावरणात मिरवणूक सुरू झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यापासून गोखलेनाका, रामआळी, एसटी बसस्थानक, शासकीय रुग्णालय, निवखोल घाटी, आदमपूर, राजिवडा, मारुती मंदिर, कर्ला व श्री साईमंदिर आंबेशेत असा आगमन मिरवणुकीचा मार्ग होता.

या मिरवणुकीत गरुडावर बसलेला गणेश, शंकराच्या रूपातील निळ्या रंगात, गळ्यात साप असलेला गणेश, रामाची प्रतिमा असलेला गणपती, फेटेवाला गणपती अशा विविध प्रकारची गणरायाची रूपे या मिरवणुकीत पाहायला मिळाली. या प्रसंगी श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी पुष्पवृष्टी केली. पोलिसांचाही बंदोबस्त होता. माजी आमदार राजन साळवी यांनी मिरवणुकीत हजेरी लावली तसेच जयसिंग घोसाळे, शेखर घोसाळे, प्रवीण वायंगणकर, भाई वायंगणकर, राजन भाटकर, मिरवणूक समिती अध्यक्ष महेंद्र सुर्वे, उपाध्यक्ष दीपक सुर्वे, मिलिंद हतपळे यांच्यासह कार्यकारी मंडळ, आदी सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular