तालुक्यातील कळंबस्ते फाट्यावर उड्डाणपूल उभारण्यासाठी कोकण रेल्वेने दहा कोटी रुपये मंजूर केले आहे. उर्वरित १० कोटी केंद्र सरकारने द्यावे, अशी रेल्वेखात्याची अपेक्षा आहे. त्यावर कोणत्याही खासदाराने सकारात्मकता दर्शवली नाही. त्यामुळे कळंबस्ते रेल्वे फाट्यावर उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव धूळ खात पडून आहे. कोकण रेल्वेमार्गावर दिवसातून ६० रेल्वेगाड्या धावत असल्याने तालुक्यातील कळंबस्ते येथील रेल्वे फाटक सुमारे चार तास बंद करावे लागते. पंधरागाव विभागातील ग्रामस्थांचा हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी २० कोटींचे तयार केलेले अंदाजपत्रकही धूळ खात पडले आहे.
तालुक्यातील कळंबस्ते येथे मुख्य रस्त्यावर रेल्वे फाटक आहे. या मार्गावरून नवी कोळकेवाडी, मोरवणे, दळवटणे, निरबाडे, खांदाटपाली तसेच खेड तालुक्यातील काडवली, धामणंद, मुसाड, भिलसई, चोरवणे, चिरणी, आंबडस हा भाग पंधरागाव नावाने सर्वदूर परिचित आहे. हजारोंच्या संख्येने या गावांमध्ये लोकवस्ती असून चिपळुणात ये-जा करण्यासाठी कळंबस्ते हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावरील रहदारीचे प्रमाणही वाढले आहे. एखाद्या वेळी रेल्वे फाटक पडले असल्यास वाहनांची लांबच लांब रांग लागते. त्यातच आता रेल्वे मार्गावर जादा व रो-रो स्वरूपाच्या गाड्यांचे प्रमाण वाढले असल्याने दिवसातून अनेकदा रेल्वे फाटक बंद करावे लागते. अशा वेळी रुग्ण असो अथवा अन्य कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यास येथे ग्रामस्थांपुढे डोकेदुखी झाला आहे.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. महामार्गावर एखादी घटना घडली तर अवजड वाहनांसाठी हा मार्ग बंद केली जातो. अनेकवेळा चार आसनी वाहनेही चिरणी- कळंबस्तेमार्गे सोडली जातात. ही वाहने कळंबस्ते रेल्वे फाटा येथून पुढे जातात. रेल्वे जाण्यासाठी हा मार्ग बंद केल्यानंतर वाहने या ठिकाणी अडकून पडतात. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांच्याकडून या विषयीचा वेळोवेळी पत्रव्यहार केला आहे. त्यानंतर कोकण रेल्वे महामंडळाने उड्डाणपूल उभारण्यासाठी २० कोटींचे अंदाजपत्रक तयार केले. यातील ५० टक्के म्हणजे १० कोटी रुपये कोकण रेल्वेने मंजूर केले. उर्वरित दहा कोटी रुपये शासनाने द्यावे, अशी कोकण रेल्वे महामंडळाची मागणी आहे. रेल्वेने निधीची तरतूद केली आहे; मात्र उर्वरित निधीचा प्रश्न कायम असल्याने प्रस्ताव बारगळला आहे.