लोककलावंत संस्था, निर्माते, लोककला पथकांचे मालक यांना कोविड काळात आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. यासंदर्भात गुरुवारी वर्षा निवासस्थान येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्यविभागाची बैठक झाली. या बैठकीला सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लोक कलावंतांना एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली असून, यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा, असे निर्देश दिले आहेत.
मागील दीड वर्षांपासून महाराष्ट्र कोविड संसर्गाशी लढत आहे. राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये होणार्या सार्वत्रिक सांस्कृतिक कार्यक्रमांवर पूर्णत: बंदी घालण्यात आल्याने, अनेक कलाकार आर्थिक समस्येला तोंड देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ही बाब लक्षात घेऊन राज्यातील एकूण ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. पुणे, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, येथे जवळपास ८ हजार कलाकार असून, राज्यात उर्वरित जिल्ह्यामध्ये जवळपास ४८ हजार कलाकार आहेत. जवळपास २८ कोटी रुपये खर्चून या कलाकारांना प्रती कलाकार ५ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.
सांस्कृतिक मंत्री देशमुख यांनी याबाबत माहितीमध्ये, कोविडमुळे वर्षभरात कोणत्याही पारंपारिक कलेचे प्रयोगच न झाल्याने उत्पन्नाचे साधनच उपलब्ध नसल्याने, त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले असून दशावतार, नाटक, शाहिरी, संगीतबारी, तमाशा, फड पूर्णवेळ, खडीगंमत, तमाशा फड हंगामी, झाडीपट्टी, विधीनाट्य, सर्कस आणि टुरींग टॉकीज अशा जवळपास ५४७ संस्थांतील कलाकारांना मदत पूरविण्यात येणार आहे. त्यासाठी ६ कोटी रुपये खर्च असल्याचे सांगितले आहे.