राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात वाढत जाणार्या कोरोना रुग्णांच्या संख्येबद्दल भाष्य केल आहे. सध्या राज्यात ३६ हजार कोरोना रुग्ण आढळून आले असून आपण आता हळू हळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत असल्याचं ते बोलत होते. अनेक ठिकाणी विविध प्रकारचे कोरोना प्रतिबंधित कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
“आता लावलेल्या निर्बंधाचं पालन करणं गरजेचं असून, जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे,” असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय निर्बध अजून कडक करावे लागतील असा इशारा देखील टोपे यांनी दिलाय. मास्क नसेल तर दंड करा, गर्दी टाळा असे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात येतील असंही टोपे म्हणाले. कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याची गरज नाही पण, तो रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच लागतील, असंही त्यांनी म्हटलंय.
मुंबईसह राज्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी, उपनगरी रेल्वे प्रवासावर तूर्त र्निबध लागू करण्यात येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी स्पष्ट केल़े. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन्स अजून बंद करण्या इतपत परिस्थिती उद्भवली नाही.त्याचप्रमाणे विकेंड लॉकडाऊन किंवा जिल्हाबंदीचाही तूर्तास विचार नसल्याचे त्यांनी सांगितल़े.
धार्मिक सोहळे, सार्वजनिक कार्यक्रम आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यावर राज्य सरकारने र्निबध घातले असले, तरी रेल्वे व बेस्ट बसगाडय़ांमधील गर्दीमुळे मुंबईत कोरोनाचा आकडा वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात येते. मात्र, कोरोनाच्या दोन्ही लस मात्रा झालेल्या सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाची परवानगी दिलेली असून, लोकल प्रवासावर सध्या कोणतेही र्निबध घालण्यात येणार नाहीत, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
लहान मुले व तरुणांमध्ये कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली असली तरी मुले व तरुणांची हॉटेल्स, मॉल्स आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये, असे आवाहन करण्यात आल़े आहे.