कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कोणताही सार्वजनिक रित्या कार्यक्रम करायचे असतील तर त्यावर आता निर्बंध घालण्यात आले आहेत. धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ, राजकीय मेळाव्यासाठी स्थानिक तहसिलदार, प्रांत यांची परवानगी आवश्यक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले आहेत. प्रत्येक कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी ठराविक मर्यादा आखून देण्यात आली आहे.
कोविडचा नवीन विषाणू ओमीक्रॉनचा प्रसार होण्याचा धोका वेगाने वाढत चालला आहे. विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंदीस्त सभागृह, मोकळी जागा, इतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय धार्मिक कार्यक्रम, मेळाव्यांच्या बाबतीत कोरोना विषाणूंचा फैलाव होणार नाही याची आयोजकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांना परवानगी देण्याची जबाबदारी उपविभागीय स्तरावरून दिली जाणार आहे.
बंदिस्त सभागृह, मोकळ्या जागेतील लग्नसमारंभासाठी संबंधित तहसिलदार, प्रांत यांना शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या व्यक्तींच्या मर्यादेत परवानगी देण्याबाबत प्राधिकृत करण्यात आले आहे. उर्वरित कार्यक्रमासाठी प्रांताची परवानगी आवश्यक आहे. शासन निर्देशानुसार दिलेल्या व्यक्तींच्या मर्यादेत अशा कार्यक्रमांना परवानगी देण्याचे अधिकार प्रांताकडे आहे. प्रतिबंधीत क्षेत्र वगळून जिल्ह्याच्या उर्वरित क्षेत्रासाठी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जाहीर केले आहे.
जिल्ह्यात वाढत चाललेली रुग्णसंख्या पाहता, कोरोना विषाणूच्या संसार्गावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले होते. काही दिवसांपूर्वी अगदी शून्य संसर्ग, दिवसाला एकही संक्रमित रुग्ण आढळलेला नाही एवढी दिलासाजनक परिस्थिती होती. परंतु मागील आठवड्यापासून रुग्ण संख्येमध्ये वेगाने वाढ व्हायला सुरुवात झाल्याने, जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमाबाबत निर्बंध कडक करण्यात आले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय एकही सार्वजनिक कार्यक्रम घेणे शक्य होणार नाही आहे.