प्रत्येक आई-वडिलांच्या आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल, त्यांच्या विवाहाबद्दल अनेक आकांक्षा असतात. विशेष करून मुलीच्या पालकांना योग्य वयात, योग्य जोडीदाराबरोबर मुलीचा विवाह करून दिला कि, त्यांची विशेष काळजी मिटते. कायद्यानुसार, विवाहासाठी मुलीचे १८ आणि मुलाचे २१ असे वय पूर्ण असणे बंधनकारक आहे. परंतु, केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी दोन मोठ्या सुधारणांशी संबंधित विधेयकांना मंजुरी दिली.
पहिली विशेष सुधारणा म्हणजे तरुणींच्या लग्नाच्या वयाशी संबंधित असून, कॅबिनेटने तरुण व तरुणींसाठी लग्नाचे किमान वय एकसमान म्हणजेच २१ वर्षे करण्यास मंजुरी दिली आहे. हा कायदा लागू झाल्यास तो सर्व धर्म व सर्व वर्गांतील मुलींच्या बाबतीत समान असेल. त्यामुळे त्यांचे विवाहाचे किमान वय बदलेल. तर दुसरीकडे, निवडणूक सुधारणांशी संबंधित विधेयकही मंजूर करण्यात आले आहे. तो म्हणजे मतदान ओळखपत्राला आधार कार्डशी जोडण्यामुळे नवीन मतदारांना नोंदणीसाठी अधिक संधी मिळतील. ही दोन्ही विधेयके संसदेच्या याच अधिवेशनामध्ये सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक आयोगाने मतदार कार्डला आधारशी जोडण्याची शिफारस केली आहे. जेणे करून मतदार यादीमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राहील. बनावट मतदार किंवा एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीमध्ये नोंदणी करणारे मतदारही यामुळे सापडतील. वन नेशन वन डेटाच्या दिशेने हे मोठे सकारात्मक पाऊल असल्याच सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० मध्ये तरुण आणि तरुणींच्या लग्नाचे वय एकसमान करण्याची घोषणा लाल किल्ल्यावरील आपल्या संबोधनपर भाषणामध्ये केलेली होती. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने बऱ्याच काळापासून निवडणूक सुधारणांचा मुद्दा लावून धरला होता.