मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल संध्याकाळी शारीरिक दुखण्याच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून मानेचा आणि मणक्याचा प्रचंड त्रास त्यांना जाणवत आहे. पुढील दोन-तीन दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार होणार असून ठाकरे यांनी स्वतः याबाबत सोशल मिडियाद्वारे जनतेला माहिती दिली. त्याचप्रमाणे जनतेच्या शुभ आशीर्वादाने माझी तब्येतीत लवकरच सुधारणा होईल, असा विश्वासही त्यांनी त्यावेळी व्यक्त केला.
गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे अनेक उलाढाली करण्यात आल्या. राज्याच्या सुरक्षिततेसाठी जातीनिशी लक्ष देण्यात आले असून, त्या दरम्यान क्षणाचीही उसंत मिळाली नसल्याने त्याचे शारीरिक परिणाम आता जाणवायला लागला आहेत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.
मागील दोन वर्षांचा काळ हा मुख्य करून कोविडचा मुकाबला करण्यातच गेला आहे. अचानक उद्भवलेल्या या संकटाला दूर करून सोबतच आपलं दैनिक जीवनचक्र देखील सुरळीत व्हावे यासाठी राज्यातली विकास कामं सुरू राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता, न डगमगता सातत्यानं प्रयत्न करतो आहोत.
या सगळ्यामध्ये मात्र शारीरिक दुखण्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे साहजिकच मानेचे आणि मणक्याचे दुखणे ओढवले आहे. दुखण्याकडे नाही म्हणलं तरी काही प्रमाणात दुर्लक्षच झालं आणि जो मानेवर दुष्परिणाम व्हायचा तो अखेर झालाच ! पण आता या दुखण्यावर योग्य उपचार घेणे जरुरीचे असल्याने, यासाठी डॉक्टरी सल्ल्याने मी रुग्णालयात दाखल होत असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे.
माझी तब्ब्येत लवकरच बरी होईल अशी खात्री आहे, मायबाप जनतेचे आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे हे शक्य होणार आहे. यानिमित्ताने मात्र एक जरूर सांगायचं आहे कि, कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा पार केला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे बंधनकारकच आहे. आपल्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी कोरोना निर्बंधाचे दोन्ही डोस घ्या. एखादा डोस घ्यायचा राहिला असेल तर, त्वरित लगतच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करत आहे.