कोरोनाचे भारतातील वाढते प्रमाण लक्षात घेऊन, लसीकरणासाठी शासन अनेक प्रकारची अभियाने राबवत आहेत. लसीकरणामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रभाव आटोक्यात आला आहे. परंतु, अजूनही अनेक जणांनी लसीची दुसरी मात्रा घेतलेली नाही आहे.
तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेता, अचानक उद्भवलेल्या नव्या व्हेरीयंट ओमायक्रॉनचे वाढते प्रमाण पाहता, सर्व कार्यालयातील कर्मचार्यांना लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. गुगलने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. ज्या कर्मचार्यांनी अद्याप लस घेतलेली नाही, त्यांनी ती तातडीने घ्यावी, अन्यथा त्यांच्या पगारात कपात केली जाऊ शकते. किंवा त्यांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागू शकते.
३ डिसेंबरपर्यंत गुगलने कर्मचार्यांना त्यांच्या लसीकरणाचा स्टेटस आणि मेडिकल किंवा धार्मिक सूट संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. आता कंपनीने कर्मचाऱ्यांची लसीकरणाची मुदत वाढवून १८ जानेवारीपर्यंत केली आहे.
गुगलने म्हटले आहे की, जर कोणत्याही कर्मचाऱ्याने ३ डिसेंबरपूर्वी आपले लसीकरण प्रमाणपत्र अपलोड केले नाही तर ते त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात करतील. त्यानंतर त्यांना लसीकरण करण्यासाठी १८ जानेवारीपर्यंत वाढीव वेळ देण्यात येईल. आणि वाढीव वेळ देऊन सुद्धा जर त्यांनी तसे न केल्यास, त्यांना ३० दिवसांच्या सशुल्क प्रशासकीय रजेवर पाठवण्यात येईल. यानंतर, त्यांना ६ महिन्यांसाठी विनावेतन वैयक्तिक रजेवर ठेवले जाईल. त्यानंतरही त्यांनी लसीकरण न केल्यास त्यांना नोकरी गमवावी लागेल असे कंपनीने स्पष्ट केले आहे. लसीकरण वेळेत केल्याने संसर्गाची भीती कमी होते. आणि नवीन आलेल्या व्हेरीयंटची कोणतीही ठराविक लक्षणे निदर्शनास न आल्याने, निदान लसीकरणाची खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.