या सरकारचे करायचे काय…. खाली डोकं, वरती पाय,…. जुलमी सरकार हाय-हाय, महावितरणचा निषेध असो, प्रीपेड मीटरच्या निर्णयाचा धिक्कार असो…., बंद करा…. बंद करा, प्रीपेड मीटर बंद करा…..’, अशा घोषणा देत महाविकास आघाडीने मंगळवारी खेर्डी गाव दणाणून सोडले. प्रीपेड मीटरची सक्ती ताबडतोब बंद करावी, अन्यथा योग्य तो बंदोबस्त केला जाईल, असा स्पष्ट इशाराच यावेळी आम. भास्कर जाधव यांनी यावेळी महावितरणला दिला. विजेचे जुने मीटर बदलून नवीन प्रीपेड मीटर बसवण्याचा सपाटा सर्वत्र सुरू असून त्याला विरोध देखील होत आहे. परंतु त्या विरोधाला न जुमानता महावितरणचे ठेकेदार बिनदिक्कत प्रीपेड मीटर बसवत आहेत. त्यामुळे विजेचे बिल दुप्पट व तिप्पट येत असल्याने नागरिकांची मोठी ओरड होत आहे. त्यामुळे खेर्डी आणि पेढे ज़िल्हा परिषद गटातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी पुढाकार घेत जनआक्रोश मोर्चाची हाक दिली होती. त्याला खेर्डी आणि पेढे ज़िल्हा परिषद मधील महाविकास आघाडीने जोरदार प्रतिसाद दिला आणि मंगळवारी जनआक्रोश मोर्चा थेट खेर्डी येथील महावितरण कार्यालयावर धडकला.
आ. जाधवांचा सहभाग – शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव या मोर्चात सहभागी झाले होते. तर शिवसेना उबाठा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शहा, माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते, उबाठा शहराध्यक्ष सचिन कदम, उपतालुका प्रमुख सचिन शेट्ये, विभाग प्रमुख विजय शिर्के, काँग्रेसचे उपतालुका अध्यक्ष सुबोध सावंतदेसाई, राष्ट्रवादी पवार गट उपतालुका सुनिल गुरव, विभाग प्रमुख राम डिगे, बावा शिंदे, शिवसेना सचिव संभाजी खेडेकर, बाबा सुर्वे, रोशन आंब्रे, नितीन शिगवण, युवासेना विभाग अधिकारी राहुल भोसले, युवतीसेना तालुका अधिकारी शिवानी खताते, पार्थ जागूष्टे, इगबल बेबल, मुसा चौगुले, मुराद चौगुले, संजय चांदे, सुधाकर दाते, यशवंत लाड, कमाल बंदरकर, काँग्रेसचे संजय जाधव, दीपक मोरे, विनय पिटले, युसूफ बेबल यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योग्य बंदोबस्त करू : आम. जाधव – महाराष्ट्रातील सरकार हे खोटारडे सरकार आहे. पावसाळी अधिवेशनात प्रीपेड मीटरचा विषय येताच मी विरोध केला. त्यावेळी प्रीपेड मीटर खाजगी घरांना व खाजगी अस्थापणेला बसवले जाणार नाही. तर फक्त सरकारी कार्यालयांना बसवले जातील, असे सरकारने सभागृहात सांगितले होते. परंतु नंतर शब्द फिरवला, प्रत्येक विषयात सरकार दुतोंडी भूमिका घेत आहे. त्यामुळे या सरकारवर विश्वास राहिलेला नाही. जनतेने आता जागे राहिले पाहिजे. यापुढे प्रीपेड मीटरची सक्ती केल्यास सहन करणार नाही. योग्य तो बंदोबस्त करू असा स्पष्ट इशारा आम. जाधव यांनी यावेळी दिला.