23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriलांजात जबरदस्तीने डम्पिंग ग्राउंड लादण्याच्या प्रयत्न, मतदानावर बहिष्कार

लांजात जबरदस्तीने डम्पिंग ग्राउंड लादण्याच्या प्रयत्न, मतदानावर बहिष्कार

निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कोत्रेवाडी नागरिकांनी घेतला आहे.

स्थानिक नागरिकांचा विरोध डावलून शहरातील कोत्रेवाडी येथे जोर जबरदस्तीने डम्पिंग ग्राउंड प्रकल्प लादण्याच्या लांजा नगरपंचायत प्रशासनाच्या भूमिके विरोधात प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंती आणि आंदोलने करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर नागरिकांनी आगामी विधानसभेसह सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी लांजा तहसिलदार प्रियांका ढोले यांना सादर करण्यात आले. लांजा नगरपंचायतीमार्फत कोत्रेवाडी येथे भोंगळ कारभार करून आणि बोगस प्रस्तावाद्वारे वाडीवस्तीजवळ डम्पिंग ग्राउंड प्रकल्प लादून जनजीवन उध्वस्त करण्याचा घाट प्रशासनाकडून घातला गेला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या विरोधात नागरिकांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, लांजा तहसील कार्यालय, नगरपंचायत प्रशासन यांच्याकडे अनेकवेळा तक्रार केलेली आहे.

अनेक वेळा या विरोधात आंदोलने, उपोषणाचा मार्ग देखील अवलंबिण्यात आला होता. मात्र ती देखील नागरिकांच्या न्याय हक्काकडे नगरपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लांजा नगरपंचायतीकडे घनकचरा प्रकल्पासाठी इतर अन्य जागांचे प्रस्ताव उपलब्ध असताना देखील नगरपंचायत कोत्रेवाडी या एकाच जागेवर अडून बसली आहे. मुळातच या प्रस्तावित जागेकडे जाण्यासाठी शासनाचा अधिकृत रस्ता नाही तसेच जलस्त्रोत आहेत. तसेच वाडीवस्ती जवळ आहे. सदर जागेची पाहणी जिल्हा समितीने करून शासनाच्या निकषात अयोग्य असल्याचा अहवाल यापूर्वीच दिलेला आहे असे असताना देखील नगरपंचायतीकडून कोत्रेवाडी येथीलच जागेवर अट्टाहास धरला आहे.

याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे. अशाप्रकारे कोत्रेवाडी ग्रामस्थ आपल्या न्याय हक्कांसाठी, अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी लोकशाही मार्गाने लढत असताना प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे घटनेने आपल्याला दिलेल्या मतदानाच्या अधिकारावर नगरपंचायत, तहसील प्रशासन व अन्य प्रशासनाकडून एक प्रकारे बाधा येत असल्याचे कोत्रेवाडी नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कोत्रेवाडी नागरिकांनी घेतला आहे. याबाबतचे निवेदन लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना सादर करण्यात आले. या निवेदनावर ५३ नागरिकांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular