तालुक्यातील ओणी येथील निवृत्त माध्यमिक शिक्षक रमेश निवृत्ती जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा शाबित झाल्याने ओणी येथीलच प्रविण मनोहर गुरव याला १ महिन्याच्या सक्तमजूरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. या खटल्याकामी सरकारी वकील अॅड. ओमकार गांगण व अॅड भालचंद्र सुपेकर यांनी काम पाहिजे. ओणी येथील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक रमेश निवृत्ती जाधव हे दि. १० फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री पावणेनऊच्या दरम्याने चारचाकी गाडीतून ओणीतून घरी जात असताना माऊली मेडिकल स्टोअर्ससमोर लिंगायतवाडीकडून दुचाकीवरून येणाऱ्या ओणी येथीलच प्रविण मनोहर गुरव यांची दुचाकी मागचे उजव्या बाजुने चारचाकीच्या इंडीकेटरला घासली होती. त्यानंतर गुरव यांनी जाधव यांना जाब विचारला. त्यावेळी माझे घर जवळ आहे आपण घरी बोलू असे सांगितले. व घरी गाडी लावून त्यासंदर्भात बोलण्यासाठी बाहेर आले तिथे गुरवही आले.
दरम्यान गुरव यांनी फोन करुन काही लोकांना बोलावून घेतले. तेव्हा तिथे प्रविण गुरव व चार ते पाच लोक तेथे आले होते. त्यामध्ये कमलाकर गुरव, दीपक गुरव, व प्रविणचे पाठीमागे गाडीवर बसलेला अंकुश मासये व अन्य दोघे तिघे होते. त्या लोकांसमोर प्रविण याने आपल्या तोंडावर हाताचे ठोशाने जोरात मारले. त्यामुळे आपल्या तोंडातील एक दात पडून ओठ फाटला. या मारहाणीत खाली जमिनीवर पडल्याने आपल्या डाव्या हाताच्या मनगटाला मार लागला. त्यानंतर येथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी आपली सोडवणूक केली. त्यावेळी पत्नी सौ. शोभा जाधव बाहेर आली तिच्याही उजव्या हाताला पिरगळले. व त्यामुळे हाताला जखम झाली व नाकाला दुखापत झाली व त्यानंतर तो शिविगाळी देवून निघुन गेला. त्यानंतर मला किरण अण्णा भोसले व रुपाजी भाऊ कांबळे रा. वाटुळ यांनी ओणी सरकारी दवाखान्यात औषधोपचाराकरीता दाखल केले. तिथे डॉक्टर स्वामी यांनी औषधोपचार केले. व माझे तोंडावर टाके टाके घातले. याबाबतची श्री. जाधव यांनी तक्रार केली होती.
तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक यांनी तपास केला असून त्यांच्यावर ५०४, ५०७, ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत राजापूर न्यायालयात दाखल खटल्याच्या सुनावणीत आरोपी प्रवीण मनोहर गुरव याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३२५ अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम २४८ (२) नुसार प्रविण गुरव याला दोषी ठरवण्यात आले. फिर्यादी रमेश निवृत्ती जाधव यांना गंभीर दुखापत केल्याबद्दल एक महिना सक्तमजुरीची शिक्षा आणि एक हजार दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.