26.7 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeDapoliराजन साळवींपाठोपाठ माजी आमदार संजय कदमही शिंदे गटाच्या वाटेवर?

राजन साळवींपाठोपाठ माजी आमदार संजय कदमही शिंदे गटाच्या वाटेवर?

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि संजय कदम यांची मुंबईत बैठक झाल्याचे बोलले जाते.

शिवसेना ठाकरे गटाला राज्यात धक्क्‌यांवर धक्के बसत आहेत. अनेक नेते पदाधिकारी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर दापोली नगर पंचायतीमधील ठाकरे गटाचे नगरसेवक वेगळा गट स्थापन करत शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. यानंतर आता पुन्हा कोकणात ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि संजय कदम यांची मुंबईत बैठक झाल्याचे बोलले जाते. मुंबईतील रामदासभाई कदम यांच्या पालखी बंगल्यावर माजी आमदार संजय कदम आणि रामदासभाई कदम यांनी एकत्रित स्नेहभोजन घेतल्याची चर्चा सुरू आहे, मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय कदम यांचा मुंबईत लवकरच पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल अशी चर्चा सुरू आहे.

संजय कदम हे सध्या शिवसेना ठाकरे गटाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख आहेत. नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक त्यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून मशाल या ठाकरे गटाच्या निशाणीवर लढविली होती. विद्यमान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांचा पराभव केला. या पार्श्वभूमीवर राजन साळवीनंतर आता संजय कदम हे उध्दव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा शिवसेना वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे माहिती हाती आलेली नाही. दरम्यान माजी आमदार संजय कदम यांच्याकडे याबाबत विचारणा करण्यासाठी पत्रकारांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क न झाल्याने त्यांची बाजूही कळू शकली नाही. मात्र आता शिवसेना वर्तुळातच संजय कदम लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा जोरात सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular