आयुर्वेद आणि उपचार पद्धती कायमच दिर्घोपयोगी ठरतात असे म्हणतात. भारतामध्ये पुरातन काळापासूनच अनेक आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर उपचार पद्धतीमध्ये केला जात आहे. अनेक गोष्टी आपण रोजच्या व्यवहारामध्ये वापरत असून सुद्धा त्याच्या वैद्यकीय गुणधर्माबद्दल अनभिज्ञ असतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावच्या देवराईमध्ये रक्त चंदनाच १५० वर्षे जुनं झाड आहे. तज्ञांच्या मते, या झाडाची किंमत तब्बल १०० कोटीच्या घरात आहे. रक्तचंदन हे बहुगुणी असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील किंवा स्थानिक बाजारातील रक्त चंदनाला असलेली मागणी व त्याचा उपयोग पाहता या रक्त चंदनाच्या झाडाची किंमत तब्बल ५० ते १०० कोटीच्या दरम्यात जाते.
सध्या या १०० कोटीच्या रक्तचंदनाच्या झाडाचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह वनविभाग या झाडावर लक्ष ठेवून आहेत. सध्या रक्तचंदनाला पाच ते सहा हजार रूपये प्रति किलो भाव आहे. या दरानं मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये याला प्रचंड मागणी आहे. रक्त चंदनाची एक फुटाची बाहुली देखील लाखाच्या दराने विकली जाते.
या झाडाचं आयुष्य देखील जास्त असते. शिवाय झाडाच्या लाकडाचे विशेष म्हणजे याची घनता जास्त असल्या कारणाने या झाडाचं लाकूड पाण्यावर तरंगत नाही तर ते सरळ बुडते. साधारण एक फुटाच्या लाकडाचे वजन केलं तरी त्याचं वजन मोठ्या प्रमाणात दिसून येतं.
रक्त चंदनाचे विविध उपयोग आहेत. हे विशेषता आंध्रप्रदेशमधील चित्तुर, नेल्लोर, कडप्पा, कुरनुल तामिळनाडू जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. त्याचप्रमाणे जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अमिरात इत्यादी देशांमध्ये याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

