मेहनतीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतीमधूनही उत्पन्न घेता येते, हे चिखलगाव येथील उत्तम भुवड या पदवीधर तरुणाने दाखवून दिले आहे. कला शाखेतून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उत्तम याने वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष दिले. पावसाळ्यात भातशेती आणि त्यानंतर पालेभाजी, फळभाजी, कंदमुळे, कलिंगड लागवड करत वर्षाला सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न भुवड मिळवत आहेत. गेली नऊ वर्षे ते वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने घेत आहेत. पावसाळ्यात नाचणी तर पुढील आठ महिने कणगरची शेती करतात. त्याला जोड म्हणून भेंडी, पावटा, कडवा, मिरची, वांगी, काकडी, कलिंगड आणि पालेभाजीचे उत्पादन घेत आहेत. २०१५ पासून ते भाजीपाल्यांमधून उत्पन्न घेत आहेत. कणगर या कंदमुळाची लागवड गेल्या ४ ते ५ वर्षांपासून घेत आहेत.
१५ एकर क्षेत्रांवर हंगामानुसार ते शेती करत आहेत. कंदमुळाचे सर्वाधिक पीक घेणारे तालुक्यातील एकमेव शेतकरी आहेत. त्यांनी पिकवलेल्या कंदमुळांना बाजारात मोठी मागणी आहे. दहा गुंठे जमिनीत २ टन कणगराचे उत्पादन ते दरवर्षी घेतात. यामधून सव्वा ते दीड लाख रुपये उत्पन्न त्यांना मिळते. बाजारात कणगराला ८० रुपये घाऊक, तर १२० रुपये किरकोळसाठी दर मिळतो. कणगर लागवडीबरोबरच कोकणात काकडीचे उत्पादन चांगले असून, मागणीही भरपूर आहे. पाहिजे तो दर मिळत असल्याने ८ गुंठे क्षेत्रांत १.५० टन काकडीचे उत्पादन घेतले जाते. यंदा वन्यप्राण्यांनी काकडीचे भरपूर नुकसान केले आहे. ते म्हणाले, जंगलातील रोहिंग्या अशी ओळख असलेल्या नीलगायींचा प्रचंड त्रास होतो.
अगदी उंच कुंपण जरी केले तरी त्यावरून उडी मारून त्या गाई शेतात शिरतात आणि नुकसान करतात. १५ दिवसांपूर्वी २० गुंठ्यात केलेली भेंडी नीलगायींनी खाऊन टाकली. साधारण, एक लाख रुपयांचे उत्पन्न आताच्या पिकातून आम्हाला मिळाले असते. त्याचबरोबर पाखरांचादेखील त्रास होतो. त्यावर मात करत आम्ही शेती करत आहोत. यावर काहीच पर्याय नाही. नुकसान झाल्याची तक्रार कृषी खात्याकडे केली होती. अधिकाऱ्यांनी पंचनामाही केला आहे. या वन्यप्राण्यांपासून बचावासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, तरच शेतकरी उभा राहू शकेल.
अशी होते कणगराची लागवड – लागवडपूर्वी जमीन नांगरणी करून चर तयार केले जातात. त्यात थोडं गवत आणि शेण टाकून ठेवले जाते. त्यामुळे जास्तीत जास्त गांडूळ निर्मिती होते. एप्रिल महिन्याच्या २० तारखेपर्यंत माती ओढून बियाणे लावून घेतो. त्याला आलेले वेल दिवाळीपर्यंत सुकतात. त्यावेळी ते काढायला सुरुवात केली जाते. त्याच्या मुळाला कणगर कंदमुळ असते. अगदी डिसेंबरपर्यंत ती काढणी सुरू राहते. अशा प्रकारे कणगराचे पीक घेतले जाते.

