मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणात उद्ध्वस्त होणाऱ्या कुवारबाव बाजारपेठेत उड्डाणपूल आणि भराव टाकून उंच मार्ग उभारण्याचा विचार सुरू होता; मात्र बाजारपेठ परिसरात दोन्ही बाजूला ४५ मीटरचा चौपदरी रस्ता करण्यात येणार आहे. त्याचा कुवारबाव बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. याला मिऱ्या-नागपूर महामार्गाचे प्रकल्प अधिकारी वसंत पंदेरकर यांनी दुजोरा दिला. पालकमंत्री उदय सामंत यांनी कुवारबाव बाजारपेठ वाचवण्यासाठी पावले उचलली होती. व्यापारी संघाकडून होत असलेल्या मागणीचा आधार घेऊन पालकमंत्री सामंत यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
कुवारबाव येथील व्यापाऱ्यांना जसा रस्ता हवा तसा करून देण्याचा प्रस्ताव तयार करून घेतला. कुवारबाव येथील व्यापाऱ्यांनी एकजुटीने या बाजारपेठेचा प्रश्न मांडला होता. मिऱ्या-नागपूर महामार्गामुळे कुवारबाव बाजारपेठेची दैनावस्था झाली होती. या प्रश्नाविषयी कोल्हापूर विमानतळावर केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत व्यापारी संघटनेची बैठकही झाली होती. त्या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. चौपदरीकरणामध्ये कुवारबाव बाजारपेठ उद्ध्वस्त होणार असून, त्यामध्ये ३०० ते ४०० व्यापारी उद्ध्वस्त होणार होते. त्यामुळे त्याला प्रचंड विरोध झाला. जमीनमोजणी प्रक्रियेलाही व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. त्या ठिकाणी रस्ता समान पातळीला आणण्यासाठी सुमारे चार मीटर भराव टाकण्यात येणार होता.
त्यामुळे बाजारपेठ खाली राहणार असून त्याचे महत्त्व उरणार नाही, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला होता. तसेच सेवा मार्गाचाही प्रश्न उपस्थित केला होता. त्या बैठकीनंतर उड्डाणपूल बांधण्याबाबत चाचपणी सुरू झाली. १.०१ कोटींचा १६ पिलरचा उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता. पूल झाला तर कुवारबाव बाजारपेठेला काहीच उपयोग होणार नाही आणि व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल, अशी मागणी स्थानिकांनी केली होती. त्यामुळे ना उड्डाणपूल ना भर टाकली जाणार. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे कुवारबाव येथील रस्ता चौपदरी करण्यात येणार आहे. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.