मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यांतून चौपदरी वाहतूक सुरू झाल्याने कोकणवासीयांचा प्रवास अखेर सुसाट झाला. राष्ट्रीय महामार्ग खात्याने गळतीसह इतर तांत्रिक त्रुटींवर नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे वारंवार उभे ठाकणारे अडथळे सध्यातरी संपुष्टात आले आहेत. निराकरण करण्यासाठी महामार्ग खात्याने दोन महिन्यांपासून विशेष मोहीम हाती घेतली. गळती थोपवण्यासाठी ग्राऊटिंग तंत्राचा वापर करण्यात आला व आवश्यक दुरुस्त्या पूर्ण करण्यात आल्या. परिणामी, आता दोन्ही बोगद्यांत चौपदरी प्रवास सुरक्षित व आरामदायी झाला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात या मार्गावरून विनाअडथळा वाहतूक झाल्याने गणेशभक्तांसह सर्वसामान्य प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. पुढील काळात अशाच सुरळीत सेवेसाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने बोगद्यात गस्त व्यवस्था कायम ठेवली आहे.
राष्ट्रीय महामार्ग खात्याने गळतीसह इतर तांत्रिक त्रुटींवर नियंत्रण मिळवले आहे. या गळतीमुळे यापूर्वीची वाहतूक बंद करण्याची वेळ आली होती; परंतु आता तांत्रिक दोष बरेचसे दूर झाल्यामुळे बोगद्यातील वाहतूक पुन्हा एकदा सुसाट सुरू आहे. भविष्यात असे अडथळे येणार नाहीत यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दक्ष आहे. कशेडी येथील वाहतूक पोलिस मदतकेंद्रही प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज आहे.
वाहतूक कोंडीसह गैरप्रकारांना आळा – कशेडी बोगद्यातील तांत्रिक त्रुटी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दूर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर याठिकाणी गस्त कायम ठेवली आहे. त्यामुळे यापरिसरात किरकोळ अपघातामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळता आली आहे. त्याचबरोबर याठिकाणी गस्त सुरू असल्याने संभाव्य गैरप्रकारांनाही अपोआप आळा बसला असल्याने नागरिक व वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे.