व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या चौघांना वनविभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतले आहे. राजापूर तालुक्यातील ताम्हाणे-पाचल रस्त्यावर हा प्रकार रविवारी (ता. ५) घडला. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार राजापूर तालुक्यातील पाचल-ताम्हाणे रस्त्यावर व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी येणार असल्याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने पाचल ते ताम्हाणे मार्गावर सापळा रचला. दरम्यान, राजकुमार सुरेश शेलार (वय ३३), आकाश राजेद्र घाडगे (२९) आणि रुपेश गणपत म्हात्रे (३९) हे गोरारीतन व्हेल माशाच्या उलटीची खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पथकातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जंगलात घुसलेल्या आरोपींचा पाठलाग केला तर उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोटारीचा पाठलाग केला. जंगलात पळून गेलेल्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. मोटारीतील संशयित मात्र नेलेंमार्गे गगनबावडा, भुईबावडा दिशेने निघून गेले. परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी संपर्क केला. गगनबावडा पोलिसांशी संपर्क करून पळालेले संशयित व वाहनाविषयी माहिती दिली. गगनबावडा पोलिसांनी गगनबावडा येथे नाकाबंदी करून मोटारीसह संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी वनपाल राजापूर यांनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
त्यांना न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शुक्रवारी (ता. ९) न्यायालयाने १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रत्नागिरी येथील कारागृहामध्ये संशयितांची रवानगी केली आहे. ही कारवाई विभागीय वनअधिकारी दीपक खाडे व सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, कर्मचारी वनपाल सदानंद घाडगे, रामदास खोत व दिलीप आरेकर तसेच वनरक्षक अरुण माळी, सहयोग कराडे, प्रभू साबणे, विक्रम कुंभार, श्रावणी पवार, सिद्धेश्वर गायकवाड, आकाश कडूकर, सूरज तेली, रणजित पाटील, राजाराम पाटील व वाहनचालक अंकुश तांबट, रेस्क्यू टिम राजापूरचे विजय म्हादये, नीतेश गुरव यांनी केली.