वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका व्यक्तीची ४५ हजार ११० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथील एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ही घटना दि. २३ जून २०२५ ते दि. १७ जुलै २०२५ या कालावधीत घडली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, घटनेतील संशयित आरोपी जीवन गणपत जाधव (५५ वर्षे, रा. नाखरे ता. रत्नागिरी) याने दि. २३ जून २०२५ ते दि. १७ जुलै २०२५ या कालावधीत बाबाजी बुधाजी कोलापटे (६२ वर्षे, रा. मांडवकरवाडी, आसगे) यांना आपण वकील असल्याची बतावणी करून त्यांना विश्वासात घेवून त्यांची वॅगनआर कार भाड्याने घेतली. त्या भाड्यापोटी ३७ हजार रुपये न देता उलट जेल कँटीनचे काम देतो असे सांगून त्यांच्या जुना वापरता सॅमसंग कंपनीचा ५ हजार रुपये किंमतीचा म ोबाईल तसेच त्यांच्या पत्नीचा २ हजार रुपये किंमतीचा नोकिया कंपनीचा मोबाईल हँडसेट घेतला.
त्याचबरोबर नातीची शांती करायची आहे असे सांगून फिर्यादी बाबाजी कोलापटे यांच्याकडून १ हजार ११० रुपये किंमतीचे ३७ नारळ घेवून त्यांचेही पैसे न देता बाबाजी कोलापटे यांची एकूण ४५ हजार ११० रुपयांची फसवणूक केली, असा स्पष्ट आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. याप्रकरणी बाबाजी कोलापटे यांनी लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित आरोपी जीवन गणपत जाधव याच्याविरूध्द भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २१६ (२) आणि ३१९ (१) याप्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. जीवन जाधव या व्यक्तीवर यापूर्वी सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे अशाप्रकारच्या फसवणूकीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड या करत आहेत.