रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांना बनावट कॉलद्वारे पाणीबिल भरण्यासाठी सांगून त्यांची आर्थिक लूट केली जात असल्याच्या बनावट कॉलमुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. मागील काही दिवसांत जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांनी सुमारे १५ लाखांहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तक्रार देण्यासाठी उद्योजक पुढे येत आहेत. त्यामुळे आणखी काहीजण याला बळी पडले असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील ९ उद्योजकांच्या खात्यातून पैसे चोरीला गेले आले आहेत. एमआयडीसीकडून या संदर्भात तक्रार देताना संशयितांचे नाव आणि मोबाईल नंबर पोलिसांना देण्यात आले आहेत; मात्र पोलिसांनी अजून ठोस कारवाई केलेली नाही. डिजिटल अरेस्टनंतर फोनद्वारे पाणीजोडणी तोडण्याची धमकी देत उद्योजकांना लुबाडण्याचे सत्र सुरू झाले आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजक शिकार बनत असल्याने हे अदृश्य संकट थोपवण्याचे आव्हान रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
मागील महिन्यात जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन धुमाकूळ घातला आहे. अंगवली (ता. देवरूख) येथील एका सेवानिवृत्त महिलेची २२ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. डिजिटल अरेस्ट या सायबर गुन्हेप्रकारातील गुन्ह्याची व्याप्ती आता वाढत आहे, ती उद्योजकांपर्यंत पोहोचली आहे. उद्योजकांना रात्री कॉल केले जात आहेत. मोबाईल अॅप आणि एपीके फाईलद्वारे तत्काळ पाणीबिल भरण्याची सूचना केली जात आहे. पाणीबिल न भरल्यास त्यांची जोडणी तोडली जाईल, अशी धमकीही दिली जात आहे. एमआयडीसीने एकदा पाणीजोडणी तोडली तर ती पुन्हा सुरू करण्यासाठी किमान एक ते दोन दिवसाचा कालावधी लागतो. याचा आपल्या उत्पादनावरती परिणाम होईल, या भितीने काही उद्योजक सायबर क्राईमद्वारे फसवणाऱ्यांना बळी पडत आहेत. आलेल्या फोन कॉलला प्रतिसाद देऊन ऑनलाइन व्यवहार करत आहेत.
दुसऱ्या दिवशी एमआयडीसीच्या कार्यालयात उद्योजक संपर्क करतात तेव्हा एमआयडीसीकडून त्यांना रात्रीच्यावेळी आम्ही कॉल केलाच नाही, असे सांगितले जाते तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे उद्योजकांच्या लक्षात येते; परंतु तक्रार देण्यास उद्योजक धजावत नव्हते; मात्र ‘सकाळ’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर लोटेतील राजकुमार जैन हे उद्योजक पुढे आले आणि त्यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात आपली दोन लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. चिपळूणमधील एका शैक्षणिक संस्थेच्या खात्यातून तब्बल सहा लाख रुपये चोरण्यात आले आहेत. येथील नऊ उद्योजकांच्या खात्यातून पैसे चोरीला गेल्याचे समोर आले आहे. यातील काहींनी अजून तक्रार दिलेली नाही. लोटेसह खेडर्डी, खडपोली, रत्नागिरी आणि देवरूखमधील उद्योजकांनाही अशाच प्रकारे ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. ही रक्कम सुमारे पंधरा लाखापर्यंत आहे.
एक नजर – १५ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक. बनावट कॉलमुळे उद्योजक त्रस्त. एमआयडीसीकडून पोलिसात तक्रार. पोलिसांकडून ठोस कारवाई होण्याची अपेक्षा. जिल्हा उद्योजक संघटनेकडून जनजागृती.
अशी होते पैशाची चोरी – उद्योजकांना रात्री फोन करून त्यांचे २०० ते ५०० रुपये पाणीबिल शिल्लक आहे ते तत्काळ भरा नाहीतर कनेक्शन तोडू, असे धमकावले जाते. एपीके फाईल उद्योजकांच्या व्हॉटस् अॅपवर पाठवली जाते. उद्योजकाने ती फाईल डाउनलोड केल्यानंतर उद्योजकाचे अकाउंट हॅक होते आणि त्यातून पैसे चोरले जातात. कधीही लिंक पाठवूनही उद्योजकांची फसवणूक केली जाते.

