कोकण रेल्वे हाऊसफुल, तर एसटी व खासगी बसचे तिकीट महागडे असल्यामुळे महिना १५-२० हजार रुपये कमावणाऱ्या सामान्य चाकरमान्यांसमोर गावी जायचे कसे असा प्रश्न होता. परंतु चाकरमान्यांना गणपती पावला असून अनेक राजकीय पक्षांतर्फे मुंबईतील प्रत्येक प्रभागांमधून मोफत बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गणपतीला कोकणातं जायचे टेन्शन दूर झाले असून पैशांची बचत होणार आहे. रेल्वेतील वाढत्या एजंटगिरीमुळे आगाऊ आरक्षणापासून सर्वसामान्य नागरिक दूरच राहतात. ज्या चाकरमान्यांकडे मुबलक पैसा आहे असे चाकरमानी दामदुप्पट पैसे देऊन एजंटकडून तिकीट खरेदी करतात. पण सामान्य चाकरमान्यांना दामदुप्पट पैसे देऊन तिकीट खरेदी करता येत नाही.
त्यामुळे अनेक जण रेल्वेच्या जनरल डब्यातील गर्दीतून त्रास सहन करत १० ते १२ तास प्रवास करतात. त्यात गाड्या लेट झाल्या तर हा प्रवास १५ ते २० तासांपर्यंत पोहचतो. पण गणपतीला गावी जाणं महत्त्वाचं असल्यामुळे प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन प्रवास करतो. गणेशोत्सवात खासगी बसचे भाडे दीड ते दोन हजाराच्या घरात पोहचते. त्यामुळे सामान्य चाकरमान्यांना ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. एसटीचेही भाडे जास्त असल्यामुळे रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणे पसंत करतात. सामान्य गरीब चाकरमान्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन, भाजपसह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व अन्य पक्षाकडून दरवर्षी गणेशोत्सवात मोफत रेल्वे व बस सेवा सुरू करण्यात येते. त्यामुळे उत्सवाच्या काळात होणाऱ्या खचपिक्षा प्रवास खर्च कमी झाला आहे.
यंदा मुंबईतील २२७ प्रभागातून सर्वच राजकीय पक्षांकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात मोफत बस सोडल्या आहेत. प्रत्येक प्रभागातून किमान दहा ते बारापेक्षा जास्त बस ५ सप्टेंबरपासून कोकणासाठी रवाना होणार आहेत. याच्या पासाचे वाटपही करण्यात आले आहे. एसटीच्या बस कमी पडत असल्यामुळे अनेकांनी खासगी बस भाड्याने घेतल्या आहेत. त्यामुळे यंदा कोकणात २ हजारापेक्षा जास्त बस जाणार आहेत. रेल्वे हाउसफुल झाल्यामुळे खाजगी बसने प्रवास करण्यासाठी प्रत्येक प्रवासी किमान १५०० रुपये भाडे आहे. गणपतीला एका घरातून किमान चार ते पाच जण गावी जात असल्यामुळे त्यांना भाड्यासाठी ७ ते ८ हजार रुपये खर्च करावे लागतात. परतु मोफत बस सेवेमुळे हा खर्च आता वाचला आहे.