जयगड बंदरात सुरक्षेसाठी नांगर टाकून उभ्या असलेल्या परजिल्ह्यातील मच्छीमारांनी नौकांवरील म्हाकूळ ५० ते ६० रुपये किलोने दलालांना विकले. परिणामी, म्हाकुळाचा दर मोठ्या प्रमाणात घसरला असून, स्थानिक मच्छीमारांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. परजिल्ह्यातील मच्छीमारांकडून जयगड बंदरात उतरवल्या जाणाऱ्या मासळीकडे मत्स्यविभागाने वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे मच्छीमारांचे मत आहे. खोल समुद्रात निर्माण झालेल्या वादळाने अजस्त्र लाटा उसळलेल्या आहेत. वातावरण बिघडल्यामुळे मुंबईसह हर्णे, दापोलीतील सुमारे चारशेंहून अधिक मच्छीमारी नौकांनी सुरक्षेसाठी जयगड बंदराचा आसरा घेतला आहे. गेले चार दिवस वातावरण निवळलेले नाही.
हंगामाच्या सुरुवातीलाच चिंगळांबरोबरच बंपर म्हाकूळ जाळ्यात सापडत आहे. एका नौकेला सुमारे दीड ते दोन टन म्हाकूळ मिळाल्यामुळे मच्छीमारही सुखावलेले होते; परंतु वादळामुळे परजिल्ह्यातील मच्छीमारांना जयगड बंदरात अडकून पडावे लागले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अजून वादळ निवळण्यास दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. नौकांमध्ये असलेले म्हाकूळ खराब होण्याची शक्यता लक्षात घेऊन जयगड बंदरात अडकलेल्या परजिल्ह्यातील मच्छीमारांनी पकडलेले म्हाकूळ दलालांना विकण्यास सुरुवात केली आहे. एका किलोला ५० ते ६० रुपये दर आकारला जात असल्याची तक्रार काही स्थानिक मच्छीमारांनी केली आहे.
बंपर म्हाकूळ जाळ्यात लागल्याने त्याला चांगला दर मिळाल्यास सुरुवातीलाच मोठा आर्थिक फायदा मिळेल, अशी आशा जयगड बंदरातील मच्छीमारांना होती; परंतु, परजिल्ह्यातील मच्छीमारांनी त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. मोठ्या प्रमाणात म्हाकूळ दलालांना मिळाल्याने भविष्यातील दरावर मोठा परिणाम होणार आहे. गतवर्षी म्हाकुळाचा किलोचा दर तिनशे रुपये होता; मात्र सुरुवातीलाच कवडीमोलाचा दर मिळाल्याने स्थानिक मच्छीमारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
परजिल्ह्यातील आश्रयाला आलेल्या नौका जेटीवर आणून त्यातील मासळी उतरवून घेण्याच्या प्रकाराकडे मत्स्य विभागाकडून कानाडोळा करण्यात येत असल्याचे मच्छीमारांचे मत आहे. त्यांच्यावर वेळीच नियंत्रण ठेवले गरजेचे होते. त्यामुळे पुढील हंगामात मच्छीमारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. दरम्यान, जयगड बंदरात उभ्या असलेल्या मच्छीमारी नौकांना लागणारे अन्न व पाणी स्थानिक मच्छीमार पुरवत आहेत. वादळाच्या परिस्थितीत त्या परजिल्ह्यातील मच्छीमारांना मदत करण्यात स्थानिक कमी पडलेले नाहीत.
म्हाकुळची निर्यात – म्हाकुळला देशातच नव्हे परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. खाण्यासाठी सर्वाधिक उपयोग होतो. कोल्डस्टोरेजमध्ये म्हाकूळ साठवून ठेवून योग्य दर मिळाल्यानंतर त्याची विक्री केली जाईल. हा मासा मोठ्या प्रमाणात निर्यात करतात. सध्या हाती आलेल्या बंपर म्हाकुळामुळे दलालांना मोठा फायदा होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.