जिल्हा रुग्णालयात आता रुग्णांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. संपूर्ण राज्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण येत असतात. यामध्ये अनेकांची आर्थिक स्थिती तितकीशी चांगली नसते. आता या निर्णयाचा त्यांना फायदा होणार आहे. पूर्वी जिल्हा रुग्णालयात केसपेपरसाठी १० रुपये, एक्सरेसाठी ३० रुपये, ऑपरेशननंतर दर दिवशीच्या खर्चाचे ६० ते ७० रुपये, सिटीस्कॅनसाठी ७०० रुपये, रक्तचाचणी, सोनोग्राफी व अन्य चाचण्यांसाठी असे पैसे मोजावे लागत होते. मात्र आता या सर्व चाचण्या मोफत होणार आहेत. तसेच उपचारही मोफत होणार आहेत.
१५ ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. उपचार मोफत होणार असल्याने आता जिल्हा रुग्णालयातील कॅशकाऊंटर बंद होणार आहे. दरम्यान, शासनाने याबाबतचे आदेश जिल्हा रुग्णालयांसाठी काढले आहेत. मेडिकल कॉलेजसाठी हे निर्णय नाहीत. आता रत्नागिरीचे जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेज होणार असल्याची चर्चा आहे. यासाठी राजकीय प्रयत्न सुरू आहेत. मेडिकल कॉलेज म्हणून मान्यता मिळाल्यानंतर मोफत उपचाराचे आदेश पुन्हा बदलणार की त्यासाठी पुन्हा शासन नवा आदेस काढणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.